Join us

पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 03:40 IST

संबंध तोडण्याची केंद्र सरकारकडे मागणी, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर टीका करीत पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या तुर्कस्तान आणि अझरबैजान या देशांविरोधात जनता कमालीची संतप्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर टीका करीत पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या तुर्कस्तान आणि अझरबैजान या देशांविरोधात जनता कमालीची संतप्त आहे. या कृतीचा निषेध करण्यासाठी भारतातील व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) या देशांसोबतचे सर्व व्यापारी आणि पर्यटन संबंध समाप्त करण्याची घोषणा केली आहे. 

शुक्रवारी झालेल्या कॅटच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी देशभरातील १२५ हून व्यापार प्रतिनिधींसोबत माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, स्वदेशी जागरण मंचाचे अखिल भारतीय संघटक कश्मीरी लाल, राष्ट्रीय सह-संयोजक अश्विनी महाजन व कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल प्रमुख उपस्थित होते.

कशाची आयात, कशाची निर्यात?

तुर्कस्तान 

निर्यात : पेट्रोलियम, वाहने व त्यांचे सुटे भाग, स्टील, रसायने, औषधे, मौल्यवान दगड, कापडआयात : क्रूड पेट्रोलियम, यंत्रसामग्री, संगमरवर, सोने, फळे, प्लास्टिक, आणि कापड

अझरबैजान

निर्यात : तंबाखू, इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रसामग्री, औषधे, सिरेमिक उत्पादने, धान्यआयात : खनिज तेल, रसायने, कच्ची कातडी, ॲल्युमिनियम, कापूस

व्यापाराची उलाढाल किती?

एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत भारताने तुर्कस्तानमध्ये ५.२ अब्ज डॉलर्सच्या मूल्याच्या उत्पादनांची निर्यात केली. २०२३-२४ मध्ये हा व्यापार ६.६५ अब्ज इतका होता. एकूण निर्यातीत याचा वाटा १.५ टक्के इतका होता. तुर्कस्तानमधून भारताने २.८४ अब्ज डॉलरच्या उत्पादनांची आयात केली. एकूण आयातीत याचा वाटा ०.५ टक्के इतका आहे. अझरबैजानला निर्यातीचा वाटा ०.०२ टक्के होता. २०२४-२५ मध्ये ८६ दशलक्ष डॉलरची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत कमी होती. तर होणारी आयात १.९३ दशलक्ष झाली, जी २०२३-२४ मध्ये ०.७४ दशलक्ष डॉलर इतकी होती.

पर्यटन उद्योगाला फटका : खंडेलवाल यांनी सांगितले की, २०२४ मध्ये तुर्कस्थानला ३ लाख भारतीय पर्यटकांकडून २९१.६ दशलक्ष डॉलर तर अझरबैजानला २.५ पर्यटकांमुळे ३०८.६ दशलक्ष डॉलरची कमाई करता आली. हा बहिष्कार घातल्याने दोन्ही देशांच्या पर्यटनाला फटका बसेल. 

 

टॅग्स :ऑपरेशन सिंदूरभारत विरुद्ध पाकिस्तान