Aman Gupta on GenZ: ऑफिसमध्ये काम करण्यावरुन जेन झी (Gen Z) सध्या चर्चेत आहेत. अशी अनेक प्रकरण समोर आले आहेत जिथे जेन झी हे ऑफिसमध्ये काम करण्यास सक्षम नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक कंपन्यांनी अनेक जेन झी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवल्यानंतर लगेचच काढून टाकल्याचंही समोर आलंय. ज्या कंपन्यांनी त्यांना काढून टाकलंय आहे त्यांचं म्हणणं आहे की या पिढीतील लोकांना कामाची काळजी नाही. तसंच, त्यांच्या कम्युनिकेशन स्कील्सही चांगल्या नाहीत. त्याच वेळी, एका भारतीय कंपनीच्या सह-संस्थापकानं जेन झी आणि तरुण मिलेनियल्सबद्दल त्यांचं वेगळं मत मांडलंय. १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेल्या लोकांना जेन झी म्हणतात. तर १९८१ ते १९९६ दरम्यान जन्मलेल्या लोकांना मिलेनियल्स म्हणतात.
ऑडिओ आणि वेअरेबल्स ब्रँड boAt चे सह-संस्थापक आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर (CMO) अमन गुप्ता यांनी जेन झी आणि तरुण मिलेनियल्सचं कौतुक केलंय. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्टही केलीये. त्यांच्या कंपनीतील बरेच कर्मचारी जेन झी पिढीतील आहेत. त्यांनी जेन झी आणि तरुण मिलेनियल्ससोबत काम करणं त्यांना का आवडतं हे देखील स्पष्ट केलंय. त्यांनी १० वर्षांपूर्वी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याच्या त्यांच्या अनुभवाबद्दल देखील सांगितलंय.
आजच्या पिढीमध्ये भीती नाही
अमन म्हणाले की जेव्हा ते कॉर्पोरेट क्षेत्रात काम करायचे तेव्हा तरुण कर्मचारी त्यांच्या बॉसच्या केबिनबाहेर उभे राहण्यासही घाबरत होते. त्यावेळी ते त्यांच्या बॉसच्या प्रश्नांना प्रश्न विचारू शकत नव्हते. आजची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.
काय म्हणाले अमन गुप्ता?
'आज, २० वर्षांचे इंटर्न माझ्या ऑफिसमध्ये येतात आणि विचारतात, 'AG, आपण हे का करत आहोत? तुम्हाला खात्री आहे की हे बरोबर आहे का?' असं ते विचारतात. आजच्या पिढीमध्ये ० फिल्टर, ० भीती, ० अपराधीपणा आहे. म्हणजेच, कोणतंही ढोंग नाही, भीती नाही आणि कोणताही पश्चात्ताप नाही. ते 'हो सर, हो सर' फक्त तेव्हाच म्हणतात जेव्हा त्यांना ते म्हणायचं असतं. याचा अर्थ असा की आजचे तरुण कोणत्याही भीतीशिवाय त्यांचे विचार व्यक्त करतात. ते त्यांना जे योग्य वाटते ते करतात, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.
'हो, त्यांना कदाचित दशकांचा अनुभव नसेल, पण त्यांच्याकडे ते आहे जे आमच्याकडे नव्हतं आणि ते म्हणजे माहिती. त्यांना ते माहीत आहे जे आम्हाला माहीत नाही. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त, लवकर आणि वेगानं सर्व पाहिलं आहे. ते जागतिक नागरिक आहेत आणि जगाकडे पाहत आहेत, तर आम्ही मोठे होत असताना फक्त दूरदर्शन पाहायचो. आपल्या काळात पेप्सी घेण्यासाठी १५ मिनिटं इकडे तिकडे धावावं लागत होतं. आज सर्व काही टॅपवर उपलब्ध आहे," असंही ते पुढे म्हणाले.