Toll Tax : गेल्या २ दशकांपासून राज्यात टोल प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. निवडणुकीत अनेक नेत्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करण्याच्या वल्गना केल्या. काहींनी टोलफोडीचे आंदोलन केले. पण, टोलमुक्त महाराष्ट्र काही झाला नाही. पण, यापुढे टोलवर कोणी प्रश्नच विचारणार नाही, अशी पॉलिसी सरकार आणणार असल्याची माहिती रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (मुंबई बीकेसी) येथे शनिवारी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ही योजना १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात नवीन टोल पॉलिसीया कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल शुल्क वाढवण्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणाले की, सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे आम्ही याबद्दल जास्त काही सांगणार नाही. परंतु, १ एप्रिल २०२५ पासून आम्ही टोलचे नवीन धोरण आणत आहोत. यानंतर तुम्हाला टोलबाबत कोणताही प्रश्न विचारण्याची गरज राहणार नाही. याविषयी, त्यांनी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. पण, लोक यापुढे राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरांवर वाद घालणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
यासोबतच ते म्हणाले की, सध्या एनएचएआयचे टोल उत्पन्न ५५,००० कोटी रुपये असून येत्या दोन वर्षांत ते १.४० लाख कोटी रुपये होईल. केंद्रीय मंत्री गडकरी पुढे म्हणाले, 'गरीब लोकांनीही महामार्ग बांधणीत गुंतवणूक करावी अशी माझी इच्छा आहे. आम्ही त्यांना ठेवींवर बँकांकडून देऊ केलेल्या ४.५ टक्के व्याजाच्या तुलनेत ८.०५ टक्के व्याज देऊ.
शेतकऱ्याचा देशाच्या विकासात मोठा वाटा : नितीन गडकरीनितीन गडकरी म्हणाले की, आपल्या देशातील ६५% लोकसंख्या ग्रामीण असून विकासात त्यांचा १२% वाटा आहे. जैवइंधनावर देश झपाट्याने पुढे जात आहे. यापुढे शेतकरी आता केवळ अन्नदाताच नाही तर ते ऊर्जा प्रदाताही बनत आहेत. येत्या काही वर्षांत आपला कृषी विकास दर 20 टक्क्यांनी वाढेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी कृषी क्षेत्रातील वाढ महत्त्वाची भूमिका बजावेल. जैव इंधनाबाबत मी सुरू केलेल्या मिशनमध्ये मला यश मिळाल्याचा मला आनंद आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. आज भारतात बायो इथेनॉल, बायो सीएनजीचे ४००० प्रकल्प चालू आहेत.
'आम्ही ३६ ग्रीन एक्सप्रेसवे बांधत आहोत...' २०४७ च्या मेगा प्लॅनबाबत ते म्हणाले की, ५ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प आमच्या नजरेसमोर आहेत. आम्ही देशात ३६ ग्रीन एक्सप्रेस हायवे बनवत आहोत. ते पूर्ण झाल्यानंतर, चेन्नई ते बंगलोर २ तासात आणि मुंबई ते बंगळुरू ६ तासात पोहोचता येईल. चेन्नई ते सुरत महामार्गाचेही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये १०५ बोगदे बांधत आहोत. नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही मोठ्या योजना आखत नाही तर पूर्ण करतो. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही २०४७ पर्यंत विकसित भारत बनू.