केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना राबवली जाते. या योजनेमार्फत ७० वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळतात. या योजनेचा अधिक लोकांना लाभ घेता यावा म्हणून ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. या योजनेचे कार्ड आता अॅपवरच मिळणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आरोग्य मंत्रालयाने सोशल मीडियावरून याबद्दलची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ७० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आता आयुष्यमान अॅपवरूनच त्यांचे वय वंदना कार्ड मिळवता येणार आहे. यामाध्यमातून ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत घेता येणार आहेत.
केंद्र सरकारने २३ सप्टेंबर २०१८ रोजी आयुष्मान भारत पीएम-जेवायई ही योजना सुरू केली होती. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून ही योजना तयार करण्यात आलेली असून, या योजनेमार्फत देशभरातली शासकीय आणि यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयात कॅशलेस उपचार घेता येतात. ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात.
आयुष्मान वय वंदना कार्ड कसे मिळवायचे?
आयुष्मान अॅप डाऊनलोड करा, त्यानंतर लाभार्थी म्हणून लॉग इन करा.
कॅप्चा, मोबाईल नंबर टाका आणि नोंदणी करा. त्यानंतर ओटीपी आणि कॅप्चा कोड भरा आणि लॉगिन करा.
मोबाईल लोकेशनची परवानगी द्या. राज्य आणि आधार माहिती भरा. त्यानंतर ओटीपी टाका.
त्यानंतर लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आणि ओटीपी टाका. कॅटेगिरी आणि पिन कोडसह माहिती भरा. कुटुंबातील व्यक्तींची माहिती भरा आणि सबमिट करा.