काही दिवसापूर्वी न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर रिझर्व्ह बँकेनं कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेनं केलेल्या कारवाईनंतर बँकेच्या ठेवीदारांसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. सध्या आरबीआयनं बँकेच्या ग्राहकांना दिलासा देत २५ हजारांपर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी दिली. परंतु आता पुन्हा एकदा या बँकेचं नाव चर्चेत आलंय. दरम्यान, प्रिती झिंटाचे १८ कोटी रुपयांचं कर्ज बँकेनं माफ केल्याचा आरोप करण्यात आलाय. परंतु आता प्रिती झिंटानं या बातम्यांवर मौन सोडलं आहे.
प्रिती झिंटानं एका निवेदनाद्वारे बँकेकडून कर्जमाफीच्या वृत्तावर स्पष्टीकरण दिलंय. या बातम्यांमागचं सत्य काय आहे, हे तिनं सांगितलं. बँकेनं हे १८ कोटी रुपये माफ केल्याचा आरोपही तिनं फेटाळून लावला असून आपलं खातं बंद करण्यात आलं असून आपण ती रक्कम भरली असल्याचं म्हटलंय.
"सर्व रक्कम भरली"
प्रिती झिंटानं सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. "१२ वर्षांपूर्वीपेक्षाही अधिक वेळेपूर्वी माझ्याकडे न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेसोबतची एक ओव्हरड्राफ्टची सुविधा होती. १० वर्षांपूर्वीच मी ओव्हरड्राफ्ट सुविधेपूर्वी आपली सर्व रक्कम फेडली होती आणि ते खातं बंद झालं होतं," असं केलेल्या आरोपांवर उत्तर देताना प्रिती झिंटानं म्हटलं.