Join us

अंबानींचे नातू पहिल्यांदाच भारतात, जोरदार स्वागत; १००० साधूसंत येणार, ३०० किलो सोनं दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 08:57 IST

ईशा आणि अजय यांनी आपल्या मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा असे ठेवले आहे

मुंबई - दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आजोबा झाले आहेत. त्यांची मुलगी ईशा अंबानीने (Isha Ambani) १९ नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ईशाचे लग्न उद्योगपती अजय आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी झाले आहे. ईशाने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला आहे, त्यावेळी हे कपल अमेरिकेत होते. आता, पहिल्यांदाच ते आपल्या दोन्ही बाळांसह भारतात येत आहेत. त्यासाठी, अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांनी जय्यत तयारी केली असून अंबानींकडून आज ३०० किलो सोनं दान करण्यात येणार आहे.  

ईशा आणि अजय यांनी आपल्या मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा असे ठेवले आहे. ईशा ही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तिने वडिलांना रिलायन्सचा व्यवसाय हाताळण्यास मदत करण्यास सुरुवात केली. ईशा आणि आनंद १२ डिसेंबर २०१८ रोजी विवाहबंधनात अडकले होते. लग्नानंतर ते अमेरिकेत होते, तिथेत ईशाने जुळ्या मुलांना जन्म दिला. आता, प्रथमच ते बाळांसह भारतात येत आहेत. विमानातून भारतात येताना अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत आहे. 

ईशासह बाळांच्या स्वागतासाठी ईशा अंबानीच्या 'करुणा सिंधू' निवासस्थानावर देशभरातील एक हजार साधूसंत असणार आहेत. याप्रसंगी अंबानी कुटुंबीय तब्बल 300 किलो सोनं दान करणार आहेत. तसेच अंबानी आणि पिरामल कुटुंबाकडून पाच अनाथाश्रम सुरु केली जाणार आहेत. बाळांसाठी खास बीएमडब्लू कंपनीकडून कारसीट डिझाईन करण्यात आले असून स्पेशल ब्रँडचे कपडेही असणार आहेत. जगभरातील फेमस शेफ याप्रसंगी पंचपक्वान्न बनवणार आहेत. तसेच, तिरुपती, द्वारका येथूनही मिष्ठान्न आणण्यात येतील. एकूणच अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांमध्ये आज आनंदोत्सव साजरा होत आहे. 

आदिया आणि कृष्णा नावाचा अर्थ 

आदिया नावाचा अर्थ - सुरुवात किंवा पहिली शक्ती. आदियाचा मूळ अंक ५ आहे, अंकज्योतिष ५ नुसार आदियाचा अर्थ प्रगती, उन्नती, प्रिय असा होतो. ही मुले मजबूत, दूरदृष्टीचा, धाडसी, खर्चीक, स्वातंत्र्यप्रेमी, बेचैन आणि अध्यात्मिक असतात. 

कृष्णा नावाचा अर्थ - या नावाचा अर्थ "प्रेम, शांति आणि स्नेह" होय. कृष्णा चा मूळ अंक ८ आहे. अंकज्योतिष ८ अनुसार कृष्णाचा अर्थ प्रेमी, शक्ती प्राप्त करणारा, भौतिकवाद, आत्मनिर्भर आणि लक्ष्य प्राप्त करणारा, असा आहे.  

टॅग्स :मुकेश अंबानीईशा अंबानीअमेरिकासोनं