Reliance Industries Space Sector Entry: रिलायन्स इंडस्ट्रीजनं स्पेसटेक स्टार्टअप दिगंतरा रिसर्च अँड टेक्नॉलॉजीजमध्ये गुंतवणूक करण्यासाठीच्या चर्चेचा वेग आता वाढवला आहे. दिगंतरा असं तंत्रज्ञान विकसित करते जे अंतराळात फिरणाऱ्या सर्व मोठ्या आणि लहान वस्तू आणि तेथील कचऱ्यावर लक्ष ठेवते. या कंपनीनं एक असा उपग्रह तयार केला आहे जो ५ सेंटीमीटर पर्यंतच्या लहान तुकड्यांना देखील ओळखू शकतो.
रिलायन्सला ५० मिलियन डॉलर्स (सुमारे ४३० कोटी रुपये) गुंतवून या क्षेत्रात आपली पकड मजबूत करायची आहे. या गुंतवणुकीमुळे भारताच्या अंतराळ सुरक्षा आणि देखरेखीच्या कामाला चालना मिळेल. दिगंतरा आधीच भारत आणि अमेरिकेच्या सुरक्षा एजन्सींना त्यांच्या सेवा पुरवत आहे. अशाप्रकारे, रिलायन्सच्या या पावलामुळे देशाच्या अंतराळ तंत्रज्ञानाचा विकास होण्यास आणि जागतिक संरक्षण गरजा पूर्ण होण्यास मदत होईल.
आठव्या वेतन आयोगावर सरकारनं दिली महत्त्वाची माहिती, केंद्रीय कर्मचाऱ्यांनी जाणून घेणं गरजेचं
इकॉनॉमिक टाईम्स यासंदर्भातील माहिती दिली आहे. या गुंतवणुकीशी परिचित असलेल्या लोकांनी या गुंतवणुकीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलं. जागतिक भू-राजकीय तणाव आणि वाढत्या संरक्षण क्षेत्रातील खर्चाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या अवकाश देखरेख क्षेत्रात रिलायन्सकडून या निधीकडे एक मोठी गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं आहे. दरम्यान, रिलायन्स आणि दिगंतराच्या संस्थापकांनी या कराराबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
१२ ते १३ सर्विलांस सॅटेलाईटचं जाळं
या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीनं सांगितले की, जगभरातील वाढत्या तणाव आणि अनिश्चित परिस्थिती लक्षात घेता, आता प्रत्येक देशाला स्वतःचं तंत्रज्ञान हवं आहे जे गरज पडल्यास पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात ठेवता येईल. अशा वेळी, अशा तंत्रज्ञानाचा विकास करणाऱ्या दिगंतरा सारख्या कंपन्यांसाठी मोठी संधी आहे. २०२६ च्या अखेरीस १२ ते १३ पाळत ठेवणाऱ्या उपग्रहांचं जाळे तयार करण्याची दिगंतराची योजना आहे. आतापर्यंत कंपनीनं तीन उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. गुंतवणूकदारांकडून कंपनीला मिळणारा बहुतांश पैसा या उपग्रहांची तयारी आणि प्रक्षेपण करण्यासाठी खर्च केला जाईल.
डिफेन्स आणि स्पेस स्टार्टअप्समध्ये गुंतवणूकदारांचा रस
केवळ दिगंतराच नाही, तर आता भारतातील संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूकदारांची आवड झपाट्यानं वाढत आहे. उदाहरणार्थ, जूनमध्ये, लष्करी ड्रोन बनवणाऱ्या Raphe mPhibr १०० मिलियन डॉलर्सचा निधी मिळाला. गेल्या वर्षी, सरकारनं १,००० कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला होता, जो पुढील ५ वर्षांत सुमारे ३०-३५ अंतराळ स्टार्टअप्सना मदत करेल. याशिवाय, पिक्सेल सारख्या उपग्रह इमेजिंग कंपन्यांनाही गुगल आणि इतर परदेशी गुंतवणूकदारांकडून २४ मिलियन डॉलर्सचा निधी मिळाला आहे. इन्स्पेसिटी, ऑर्बिट स्पेस, ऑर्बिटएआयडी आणि इनबाउंड एरोस्पेस सारख्या अनेक नवीन स्टार्टअप्सनी यावर्षी लहान गुंतवणूक मिळवली आहे.