Reliance Jio News : मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील कोट्यवधी मोबाइल युजर्स जिओशी जोडलेले आहेत. आता जिओने एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. वास्तविक, जिओ जगातील दुसरी सर्वात मोठी ५जी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी बनली आहे. ५जी युजर्सच्या बाबतीत जिओने अनेक टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकलंय. जिओ ५जी युजर्सच्या बाबतीत खूप पुढे गेली आहे.
जिओने आपली ५जी सेवा ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू केली होती, तेव्हापासून जिओचे युजर्स सातत्यानं वाढत आहेत. त्याचवेळी एअरटेलनेही आपली ५जी सेवा सुरू केली, पण एअरटेल जिओच्या खूप मागे पडली आहे.
१७ कोटींचा टप्पा ओलांडला
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीचा अहवाल रिलायन्स जिओनं शेअर केलाय. ज्यानुसार जिओचा ५ जी युजर्सबेस १७० मिलियन म्हणजेच १७ कोटींच्या पुढे गेलाय. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या तिमाहीत कंपनीनं ४० दशलक्ष म्हणजेच जवळपास ४ कोटी ५जी युझर्स जोडलेत. तर गेल्या तिमाहीत जिओचा ५जी युजरबेस १३० मिलियन म्हणजेच १३ कोटी होता. एअरटेलबद्दल बोलायचे झाले तर जून २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत त्याचा ५जी युजरबेस ९० मिलियन म्हणजेच ९ कोटींच्या जवळपास होता.
जिओ दुसऱ्या क्रमांकावर
जिओच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या ५जी नेटवर्कवरील वायरलेस डेटा ट्रॅफिक ४० टक्क्यांनी वाढलंय. कंपनीच्या फायनान्शियल रिपोर्टडेटानुसार जिओ आता जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ५जी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी बनली आहे. चीनची टेलिकॉम कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे.