Kokilaben Ambani : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्या मातोश्री कोकिलाबेन अंबानी यांना शुक्रवारी सकाळी एअरलिफ्ट करून मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र, वाढत्या वयामुळे त्यांची प्रकृती गंभीर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शुक्रवारी सकाळी अंबानी कुटुंबातील सदस्य, ज्यात मुकेश आणि अनिल अंबानी यांचाही समावेश होता, दक्षिण मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात पोहोचताना दिसले. यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दलच्या चिंता अधिक वाढल्या आहेत. सध्या, अंबानी कुटुंबाकडून त्यांच्या आरोग्याबद्दल कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही, पण त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे सांगितले जात आहे.
जामनगरच्या कोकिलाबेन अंबानी२४ फेब्रुवारी १९३४ रोजी गुजरातमधील जामनगर येथे जन्मलेल्या कोकिलाबेन अंबानी यांना अंबानी कुटुंबाची 'कुलमाता' मानले जाते. त्यांना केवळ रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक दिवंगत धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी म्हणून नव्हे, तर कुटुंबाला एकत्र ठेवण्यात आणि मार्गदर्शन करण्यात त्यांच्या भूमिकेमुळेही खूप मान दिला जातो.
२००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये, मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात व्यवसायावरून वाद निर्माण झाला होता. धीरूभाई अंबानी यांनी कोणतेही मृत्युपत्र न सोडल्यामुळे दोन्ही भावांच्या नात्यात कटुता आली होती. त्यावेळी कोकिलाबेन यांनीच पुढाकार घेऊन परिस्थिती हाताळली आणि व्यवसायाची विभागणी करून वाद मिटवला. यामुळे दोघांचे संबंध पुन्हा सुधारण्यास मदत झाली. कोकिलाबेन यांनी कुटुंबाला कठीण काळातही एकत्र ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.