Mukesh Ambani : दिवसेंदिवस तंत्रज्ञानात प्रगती होत चालली आहे. आता हातातल्या मोबाईलपासून रस्त्यांवर धावणाऱ्या कारपर्यंत सर्व वस्तूंमध्ये एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आलं आहे. अलीकडेच चीनच्या डीपसीक (Deepseek) कंपनीने फ्री ओपन सोर्स एआय सादर केल्याने जगभर खळबळ उडाली आहे. एकंदरीत आगामी काळात एआय शिवाय आपलं पानही हलणार नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दरम्यान, एआयच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती मुकेश अंबानी यांनी विद्यार्थांना मोलाचा सल्ला दिला आहे. एआय, ChatGPT वरुन अंबानी यांचा विद्यार्थ्यांना सल्लापंडित दीनदयाल ऊर्जा विद्यापीठाच्या (PDEU) १२ व्या दीक्षांत समारंभाला उद्योगपती मुकेश अंबानी यांनी संबोधित केलं. अंबानी म्हणाले की, या शतकाच्या समाप्तीपूर्वी भारत जगातील 'सर्वात समृद्ध राष्ट्र' बनेल. पण, या प्रगतीमुळे पृथ्वी आणि जीवाश्म इंधनाला धोका पोहोचू नये यासाठी स्वच्छ ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. विद्यापीठाचे अध्यक्ष अंबानी पुढे म्हणाले, “मला एआयच्या संदर्भात तरुण विद्यार्थ्यांना एक सल्ला द्यायचा आहे. शिकण्याचे साधन म्हणून तुम्ही एआयचा वापर जरुर करा. पण, तुमच्या बुद्धीमत्तेचा वापर करणे कधीही सोडू नका. तुम्ही नक्कीच ChatGPT चा वापर करा. पण हे करताना आपल्या बुद्धिमत्तेद्वारेच प्रगती करू शकतो, एआयच्या मदतीने नाही, हे कायम लक्षात ठेवा.
हरित ऊर्जा ही काळाजी गरज : मुकेश अंबानीमुकेश अंबानी म्हणाले, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. आता जगातील कोणतीही शक्ती भारताचा विकास रोखू शकत नाही. यासोबतच त्यांनी पर्यावरण रक्षणाच्या गरजेवर भर देत म्हटले की, हे शतक संपण्यापूर्वी भारत जगातील सर्वात समृद्ध राष्ट्र बनेल हे मला स्पष्टपणे दिसत आहे. पण इतर प्रमुख अर्थव्यवस्थांसह भारतावरही मोठी जबाबदारी आहे. आपण आर्थिक विकास साधताना आपला ग्रह धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे जीवाश्म इंधनापासून स्वच्छ आणि हरित ऊर्जेकडे संक्रमणाला गती द्यावी लागेल.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन म्हणाले की, हरित ऊर्जा, हरित संपत्ती आणि AI यांचा संगम खऱ्या अर्थाने मानवाचे भविष्य घडवणार आहे. PDEU विद्यापीठाने या समन्वयामध्ये पुढाकार घ्यावा अशी त्यांची इच्छा आहे. या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि संचालक उदय कोटक उपस्थित होते. "विद्यार्थ्यांनी पैशापेक्षा गुणवत्ता आणि उत्कृष्टतेवर भ द्यावा, कारण, या २ गोष्टी असतील तर आर्थिक सुबत्ता आपोआप येईल, असा सल्ला कोटक यांनी दिला.