Top Five Stocks : अमेरिकेच्या टॅरिफखाली दबलेला शेअर बाजार जीएसटी कपातीनंतर सावरत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी मिळाली आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस रिसर्चने आपल्या नवीन अहवालात गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ५ कंपन्यांची माहिती दिली आहे. या कंपन्यांनी त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केली असून, भविष्यातही त्यांच्या व्यवसायात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
१. संवर्धना मदरसन (Samvardhana Motherson)संवर्धना मदरसन (SAMIL) ने आपल्या 'व्हिजन २०३०' नुसार १०८ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे महसूल उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनीने डिझाईन, इंजिनिअरिंग आणि उत्पादनात विशेष प्राविण्य मिळवले आहे. गेल्या ५ वर्षांत बाजारातील अनेक आव्हानांना तोंड देत कंपनीने आपला विस्तार केला आहे. बोईंग आणि एअरबससारख्या मोठ्या विमान कंपन्यांना सुटे भाग पुरवण्यासह, एका जागतिक ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडसोबतच्या भागीदारीमुळे कंपनीच्या विकासाला गती मिळणार आहे. अहवालानुसार, आगामी काळात कंपनीच्या नफ्यात वार्षिक १४% दराने वाढ होण्याचा अंदाज आहे.
२. आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी (Aditya Birla Sun Life AMC)आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी (ABSLAMC) ची फंड कामगिरी जानेवारी २०२५ पासून सातत्याने सुधारली आहे. कंपनी आता म्युच्युअल फंडसोबतच विविध पर्यायी गुंतवणूक उत्पादने आणत आहे. यामुळे कंपनी आपल्या मल्टी-असेट प्लॅटफॉर्मला अधिक मजबूत करत आहे. कंपनीने अलीकडेच 'एपेक्स' नावाचा एक स्वतंत्र ब्रँड सुरू करण्यास बोर्डाची मंजुरी मिळवली आहे, ज्याद्वारे गुंतवणूकदारांना नवीन उत्पादनांची संधी मिळेल. आगामी आर्थिक वर्षांत कंपनीच्या महसूल, नफा आणि कमाईमध्ये १०-११% वार्षिक वाढीचा अंदाज आहे.
३. एलेनबॅरी इंडस्ट्रियल गॅसेस (Ellenbarrie Industrial Gases)भारतातील जुन्या औद्योगिक वायू कंपन्यांपैकी एक असलेली एलेनबॅरी इंडस्ट्रियल गॅसेस वेगाने वाढत आहे. कंपनीने आपली उत्पादन क्षमता गेल्या दोन वर्षांत ४.५ पटींनी वाढवली आहे. भारतातील औद्योगिक वायू बाजारात ७.५% वार्षिक दराने वाढ अपेक्षित असून, त्याचा फायदा कंपनीला मिळेल. कंपनीने स्टील (~३७%), फार्मा/केमिकल्स (~२६%), अभियांत्रिकी आणि संरक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये आपले ग्राहक जोडले आहेत. ज्यामुळे मागणी स्थिर राहते. अहवालानुसार, पुढील तीन वर्षांत कंपनीच्या महसूल आणि नफ्यात अनुक्रमे ३९% आणि ५२% वार्षिक वाढ होण्याचा अंदाज आहे.
४. अंबर एंटरप्रायजेस (Amber Enterprises)पंतप्रधान मोदींनी जीएसटीमध्ये दोन टप्पे (५% आणि १८%) आणण्याच्या घोषणेमुळे ग्राहकांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. अंबर एंटरप्रायजेस ही कंपनी एसी उत्पादनांसाठी एक प्रमुख पुरवठादार असून, जीएसटी १८% झाल्यास एसीची मागणी वाढेल आणि कंपनीला त्याचा मोठा फायदा होईल. कंपनी एसी आणि इतर ग्राहक टिकाऊ वस्तूंच्या उत्पादनांमध्ये आपले योगदान वाढवत आहे. अहवालानुसार, कंपनीच्या महसूल, नफा आणि कमाईमध्ये पुढील तीन वर्षांत अनुक्रमे २४%, ३२% आणि ५४% वार्षिक वाढ अपेक्षित आहे.
५. हिंदुस्तान युनिलिव्हर (Hindustan Unilever)हिंदुस्तान युनिलिव्हर (HUVR) ही कंपनी भारतीय एफएमसीजी (FMCG) क्षेत्रात एक मजबूत खेळाडू आहे. कंपनीकडे एक मोठा वितरण नेटवर्क आणि विविध लोकप्रिय ब्रँड्स आहेत. ग्रामीण भागातील बाजारपेठेत होणारी सुधारणा, प्रीमियम उत्पादनांचा वाढता पोर्टफोलिओ आणि डिजिटल माध्यमांचा वापर हे कंपनीच्या विकासाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. वैयक्तिक काळजी आणि पॅकेज्ड खाद्यपदार्थांवरील जीएसटी कमी झाल्याने मागणी वाढू शकते. अहवालात पुढील तीन वर्षांसाठी कंपनीच्या महसूल आणि नफ्यात ७% ते ८% वार्षिक वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
स्टॉकचे नाव | सीएमपी (रु) | लक्ष्य (रु) | वाढ (%) |
संवर्धन मदरसन | ९९ | ११४ | १५% |
आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी | ८५५ | १०५० | २३% |
एलेनबेरी इंडस्ट्रियल गॅसेस | ५३८ | ६८० | २६% |
अंबर एंटरप्रायझेस | ७४७३ | ९००० | २०% |
हिंद. युनिलिव्हर | २६२४ | ३००० | १४% |
टीप : ही माहिती मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या संशोधन अहवालावर आधारित आहे. शेअर बाजारातीलगुंतवणूक बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.