Modi Jinping Meeting: भारताचे परराष्ट्र संबंध पुन्हा एकदा सकारात्मक वळणावर असल्याचे दिसत आहेत. काही काळापूर्वी अमेरिका आणि चीन या दोन्ही आघाड्यांवर आव्हानांचा सामना करणाऱ्या भारतानं आता परिस्थिती आपल्या बाजूने वळवल्याचं दिसून येतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळाली असून, त्याचे परिणाम विविध क्षेत्रांत दिसू लागलेत. चीनचे राजदूत शू फेइहोंग यांनीदेखील या बदलांचं स्वागत केलंय.
भारत-चीन व्यापाराचा नवा उच्चांक
अमेरिकेनं ५० टक्के आयात शुल्क लादलेलं असतानाही भारत आणि चीनमधील व्यापारी संबंधांनी नवी उंची गाठली आहे. चीनच्या राजदूतांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे १५५.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचला असून हा एक विक्रम आहे. यामध्ये वार्षिक १२ टक्क्यांची वाढ झाली असून, भारताकडून चीनला होणारी निर्यातही ९.७ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, चीनसोबतची भारताची व्यापारी तूट अजूनही १०० अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे.
तीर्थयात्रेचा मार्ग मोकळा
दोन्ही देशांमधील संबंध सुधारल्याचा मोठा फायदा भारतीयांना झाला आहे. चीननं सुमारे २० हजार भारतीयांना तिबेटमधील पवित्र स्थळांच्या दर्शनासाठी परवानगी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली प्रसिद्ध कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यास चीन सरकारनं संमती दर्शवली असून, भारतीय नागरिकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी पावलं उचलली आहेत.
व्हिसा आणि विमान प्रवास पुन्हा सुरू
संबंधांमधील सुधारणेचा भाग म्हणून भारतानंही चिनी नागरिकांसाठी आपले दरवाजे उघडलेत. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली व्हिसा सुविधा पुन्हा सुरू करण्यात येत असून, दोन्ही देशांदरम्यानची थेट विमान सेवाही बहाल करण्यात आली आहे. 'ग्लोबल साउथ'च्या विकासासाठी आणि लोकांमधील संपर्क वाढवण्यासाठी चीन भारतासोबत काम करण्यास तयार असल्याचं राजदूतांनी सांगितले.
ब्रिक्समधील युती आणि अमेरिकेचे टेन्शन
ब्रिक्स संघटनेतील भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचं चीननं स्वागत केलं आहे. ब्रिक्सच्या व्यासपीठावरून भारत, चीन आणि रशिया यांनी एकत्र येऊन व्यापारासाठी नवीन चलनाचा वापर करण्याची चर्चा सुरू केल्यानं अमेरिकेच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळे डॉलरच्या अस्तित्वावर संकट येईल, या भीतीनं डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना उघडपणे धमक्याही दिल्या होत्या. मात्र, भारत आणि चीनच्या या संयुक्त ताकदीमुळे अमेरिकेवर दबाव निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
Web Summary : Modi-Jinping meeting revitalized India-China relations, boosting trade to a record $155.6 billion. Visa services resumed, Kailash Manasarovar pilgrimage reopened. BRICS cooperation worries US.
Web Summary : मोदी-जिनपिंग मुलाकात से भारत-चीन संबंधों में नई जान आई, व्यापार 155.6 अरब डॉलर के रिकॉर्ड स्तर पर पहुंचा। वीजा सेवाएं फिर शुरू, कैलाश मानसरोवर यात्रा फिर खुली। ब्रिक्स सहयोग से अमेरिका चिंतित।