Join us

छोट्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारची मोठी योजना; 'इतके' कर्ज होणार माफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 14:42 IST

अल्प उद्योजकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारकडून या योजनेवर काम करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - विविध राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर आता अडचणीत असणाऱ्या छोट्या कर्जदारांवरील कर्ज माफ होऊ शकते. सरकारने दिवाळखोरी कायद्यातंर्गत छोट्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी योजना तयार केली असल्याचं सांगण्यात येत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार प्रस्तावित सूट दिवाळखोरी कायद्यातंर्गत नवीन सुरुवात तरतूदीमधून या सुविधेचा फायदा दिला जाणार आहे. 

कंपनी प्रकरणांचे सचिव इंजेति श्रीनिवास यांनी सांगितले की, आर्थिक अडचणीत सापडलेल्या छोट्या कर्जदारांसाठी प्रस्तावित निधी द्यावा याचा आराखडा तयार करण्यासाठी मायक्रोफायनॅन्स उद्योगासोबत विचार-विनिमय करणे सुरु आहे. व्यक्तिगत स्वरुपात दिवाळखोरीत अडकलेल्या आर्थिक कमकुवत वर्गातील लोकांना याचा फायदा होणार आहे. 

त्याचसोबत या योजनेतंर्गत जर तुम्ही नवीन सुरुवात करण्यासाठी या योजनेचा फायदा उचलला तर पुढील ५ वर्ष तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. अल्प उद्योजकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारकडून या योजनेवर काम करण्यात येत आहे. आमची अल्प उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली त्यांच्या समस्या सोडविणे आमचं काम आहे. अल्पउद्योग समुहांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून उपाययोजना सुरु आहेत असंही श्रीनिवास यांनी सांगितले. तसेच या योजनेतंर्गत छोट्या कर्जदारांना त्यांच्या पात्रतेनुसार कर्जमाफ करुन दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही सांगण्यात येत आहे.  

दिवाळखोरी कायद्यातंर्गत नवीन सुरुवात तरतुदीसाठी अनेक मर्यादा असतील. ज्यात कर्जदाराचं एकूण उत्पन्न वार्षिक ६० हजार रुपयांपेक्षा अधिक असू नये. कर्जदाराच्या संपत्तीचं एकूण मूल्य २० हजार रुपये आणि माफीसाठी पात्र कर्ज ३५ हजार रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. तसेच कर्जाचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे स्वत:चं घर असू नये अशा अटी घालण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :नरेंद्र मोदी