Join us

LPG Cylinder : महिला दिनानिमित्त मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, घरगुती LPG सिलिंडरच्या दरात कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 09:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे यासंदर्भातील माहिती दिली.

महिला दिनानिमित्त मोदी सरकारनं सामान्यांना दिलासा दिला आहे. घरगुती एलपी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून याची घोषणा केलीये. घरगुती सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करण्यात आली आहे.  

महिला दिवसाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महिलांचं जीवन सोपं होण्यासोबतच कोट्यवधी कुटुंबावरील आर्थिक बोजाही कमी होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे म्हटलंय. हे पाऊल पर्यावरणाच्या संरक्षणासाठीही मदतीचं ठरेल आणि कुटुंबाचं आरोग्यही उत्तम राहणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

 

उज्ज्वला सब्सिडीला मुदतवाढ 

तर दुसरीकडे मोदी सरकारनं एलपीजी सिलिंडरबाबत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरवर मिळणारं अनुदान एका वर्षासाठी वाढवलं ​​आहे. उज्ज्वला योजनेत स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) सिलिंडरवर देण्यात येणाऱ्या ३०० रुपयांच्या सबसिडीला १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. 

कमर्शिअल सिलिंडरच्या दरात झालेली वाढ 

मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशीच इंधन कंपन्यांचा मोठा झटका दिला होता. पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. व्यावसायिक गॅस सिलिंडर दिल्लीत २५.५० रुपयांनी तर मुंबईत २६ रुपयांनी महागला. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करून जोरदार झटका दिला. तर त्यावेळी १४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

टॅग्स :गॅस सिलेंडरनरेंद्र मोदीसरकार