Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारनं भंगार विकून कमावले कोट्यवधी रुपये; कुठून झाली इतकी कमाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 09:31 IST

केंद्र सरकार भंगार विकून प्रचंड पैसा कमावत आहे. गेल्या काही वर्षांत केंद्रातील मोदी सरकारनं भंगार विकून कोट्यवधी रुपयांची कमाई केलीये.

केंद्र सरकार भंगार विकून प्रचंड पैसा कमावत आहे. गेल्या काही वर्षांत केंद्रातील मोदी सरकारनं भंगार विकून कोट्यवधी रुपयांची कमाई केलीये. केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षांत भंगार विकून २,३६४ कोटी रुपये कमावले आहेत, अशी माहिती अहवाल उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागानं (DPIIT) दिली आहे. निरनिराळ्या सरकारी कार्यालयातून हे भंगार विकण्यात आलंय.

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत एक पोस्ट केली आहे. सरकारनं किती ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवली आहे, हे त्यांनी पोस्टमध्ये सांगितलंय. किती फिजिकल फाइल्स क्लिन करण्यात आल्या आणि किती ई-फाईल्स क्लिन करण्यात आल्या, हेही त्यांनी सांगितलं. या अभियानातून यंदा सरकारला ६५० कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.

विशेष अभियानांतर्गत करण्यात आली स्वच्छता

प्रत्यक्षात कार्यालयांमध्ये पडून असलेल्या फाईल्स आदी निरुपयोगी वस्तूंचा सरकार वेळोवेळी आढावा घेते. जितेंद्र सिंह यांच्या पोस्टनुसार, अशा प्रकारची ही चौथी मोहीम होती. त्याला 'स्पेशल कॅम्पेन ४.०' असं नाव देण्यात आले. या विशेष अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सरकारच्या तिजोरीत मोलाचं योगदान तर आहेच, शिवाय सरकारी विभागांमध्ये स्वच्छता आणि आर्थिक योगदानालाही चालना मिळाली आहे.

पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "कौतुकास्पद! प्रभावी व्यवस्थापन आणि कृतीशील कृतीवर लक्ष केंद्रित करून या प्रयत्नाचे उत्कृष्ट परिणाम दिसून आले आहेत. सामूहिक प्रयत्नातून शाश्वत परिणाम कसे साध्य करता येतात, हे यातून दिसून येतं," असं पंतप्रधान म्हणाले.

या मोहिमेत एकूण ५८ हजार ५४५ प्रत्यक्ष फायलींचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी १५ हजार ८१६ फाईल्स डिलीट करण्यात आल्या. या फायली आणि भंगाराची विल्हेवाट लावल्यानं १५ हजार ८४७ चौरस फूट जागा रिकामी होऊन १६ लाख ३९ हजार ४५२ रुपयांचा महसूल मिळाला.

टॅग्स :सरकारनरेंद्र मोदी