Join us

भारत सरकारने चीनला पुन्हा दाखवला इंगा! तब्बल ११९ अ‍ॅप्सवर बंदी; तुम्ही तर वापरत नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:48 IST

Chinese Apps Block : भारत सरकारने पुन्हा एकदा चीन विरोधात कठोर पाऊल उचललं आहे. सरकारने गुगल प्ले स्टोअरवरील ११९ अ‍ॅप्स बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले.

Chinese Apps Block :चीन कामयच भारताकडे वाकड्या नजरेने पाहत आला आहे. प्रत्यक्ष काही करता येत नाही, म्हटल्यावर चिनी सरकारने अ‍ॅप्सच्या माध्यमातून कुरघोडी करायला सुरुवात केली. हा डाव हाणून पाडण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा प्ले स्टोअरवरील मोबाइल अ‍ॅप्स ब्लॉक केले आहेत. यावेळी सरकारने चीन आणि हाँगकाँगशी संबंधित ११९ अ‍ॅप्सला बाहेरचा रस्ता दाखवला. याआधी २०२० मध्ये सरकारने अनेक चिनी अ‍ॅप्स ब्लॉक केले होते, ज्यात TikTok आणि ShareIt सारख्या व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मचा समावेश होता. यावेळी बहुतेक ब्लॉक केलेले अ‍ॅप्स व्हिडिओ आणि व्हॉइस चॅट प्लॅटफॉर्म आहेत, जे चीन आणि हाँगकाँगमध्ये विकसित केले गेले आहेत.

११९ अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची मागणीगुगलने हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या वतीने कंटेंट ट्रॅकिंगचे काम करणारी साइट लुमेन डेटाबेसवर ही माहिती दिली. भारत सरकारने Google Play Store वरून ११९ चिनी अ‍ॅप्स काढून टाकण्यास सांगितले आहे. या ११९ अ‍ॅप्सपैकी फक्त १५ अ‍ॅप्सवर आतापर्यंत बंद आणली आहे. उर्वरित सर्व अ‍ॅप्स २० फेब्रुवारी रोजी प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. चीन व्यतिरिक्त, या ११९ अ‍ॅप्समध्ये काही अ‍ॅप्स सिंगापूर, अमेरिका, यूके आणि ऑस्ट्रेलियाचे देखील आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९A अंतर्गत या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. हे कलम केंद्र सरकारला राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेच्या हितासाठी ऑनलाइन सामग्रीचा सार्वजनिक प्रवेश रोखण्याचा अधिकार देते. या कायद्याअंतर्गत यापूर्वी देखील काही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. बंदी घातलेल्या ३ चिनी अ‍ॅप्सचे डेव्हलपर्सने याबाबत गुगलकडून माहिती मिळाली असल्याचे सांगितले. आम्ही लवकर भारत सरकारशी बोलणार असून यावर तोडगा काढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

अ‍ॅप्स अजूनही बंद का झाले नाहीत?सरकारच्या सूचनेनंतर या अ‍ॅप्सची यादी १८ फेब्रुवारी रोजी लुमेनच्या साइटवर प्रसिद्ध करण्यात आली होती, जी आता काढून टाकण्यात आली आहे. काही अ‍ॅप्सना काढून टाकण्यामागे काही तांत्रिक अडचणी असल्याचं स्पष्टीकरण गुगलने दिलं आहे. सिंगापूरस्थित मँगोस्टार टीमने विकसित केलेले चिलचॅट ॲप गुगल प्ले स्टोअरवर १ कोटींहून अधिक डाउनलोड झाले आहे. त्याचे रेटिंग ४.१ आहे.

चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय का घेतला?राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेने ही कारवाई केली आहे का? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, चीन आणि हाँगकाँग व्यतिरिक्त इतर देशांमधील अ‍ॅप्सवरही बंदी घातल्याने तसेच संकेत मिळत आहेत. याचा अर्थ सरकार प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या विदेशी अ‍ॅप्सची कसून चौकशी करत असून त्यात काही अनियमितता आढळल्यास त्यावर बंदी घालण्याची कारवाई केली जाईल.

टॅग्स :चीनगुगल