Join us

मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:40 IST

Microsoft Planning Job Cuts: मे महिन्याच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टने विविध विभागांमधून सुमारे ६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.

Microsoft Layoffs : जागतिक टेक क्षेत्रात पुन्हा एकदा नोकरकपातीचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिकन टेक जायंट मायक्रोसॉफ्ट कंपनी पुन्हा हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, यावेळी मायक्रोसॉफ्टच्या विक्री विभागात ही कपात होण्याची शक्यता आहे. ही बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा मायक्रोसॉफ्ट स्वतःला पूर्णपणे बदलत असून, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.

टेक कंपन्यांमध्ये नोकरकपातीची लाटमायक्रोसॉफ्टमधील ही नोकरकपात काही नवीन नाही. यापूर्वी, मे महिन्याच्या सुरुवातीलाही मायक्रोसॉफ्टने विविध विभागांमधून सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. विशेष म्हणजे, केवळ मायक्रोसॉफ्टच नाही, तर गुगल आणि सॅमसंग यांसारख्या इतर मोठ्या टेक कंपन्यांनीही अलिकडच्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे. हे दर्शवते की तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या मोठे बदल घडत आहेत.

AI मुळे नोकऱ्या धोक्यात?या नोकरकपातीमागे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर हे एक प्रमुख कारण मानले जात आहे. कंपन्या आता एआय आणि डेटा सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. गेल्या वर्षी जूनच्या आकडेवारीनुसार, मायक्रोसॉफ्टमध्ये २.२८ लाख कर्मचारी होते. चालू आर्थिक वर्षात, मायक्रोसॉफ्टने ६.६ लाख कोटी रुपये (८० अब्ज डॉलर्स) भांडवली खर्च करण्याची योजना आखली आहे, ज्याचा मोठा भाग डेटा सेंटर्सच्या पायाभूत सुविधांवर खर्च केला जाईल.

यामुळेच 'एआय नोकऱ्या खाणार का?' हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, एआयमुळे विशिष्ट प्रकारच्या नोकऱ्या कमी होतील, पण त्याच वेळी एआयशी संबंधित नवीन नोकऱ्याही निर्माण होतील. मात्र, सध्या तरी एआयचा वाढता वापर अनेक कंपन्यांसाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे एक कारण बनत आहे.

कपात कधी?अहवालानुसार, मायक्रोसॉफ्ट पुढील महिन्यात, म्हणजेच जुलैमध्ये, या नवीन कपातीची घोषणा करू शकते, कारण तोपर्यंत मायक्रोसॉफ्टचे आर्थिक वर्ष संपेल. या संदर्भात मायक्रोसॉफ्टकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

वाचा - अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!

तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या या युगात, कंपन्या नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत असताना कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. 

टॅग्स :आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबिल गेटसनोकरीमाहिती तंत्रज्ञान