Join us

मेट्रो अमेरिकेला मागे टाकणार! दर महिन्याला टाकले जात आहेत ६ किलोमीटर रेल्वेरूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 12:21 IST

मनोहर लाल यांनी सांगितले की, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून मागील १० वर्षांत देशातील मेट्रो सेवा असलेल्या शहरांची संख्या २१ वर गेली आहे. २

नवी दिल्ली : मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारत लवकरच अमेरिकेला मागे टाकेल, असे प्रतिपादन केंद्रीय निवास व नगर व्यवहारमंत्री मनोहर लाल यांनी केले आहे. मनोहर लाल यांनी सांगितले की, २०१४च्या आधी देशात दर महिन्याला फक्त ६०० मीटर मेट्रो लाइनची निर्मिती केली जात होते. आता दर महिन्याला ६ किलोमीटर मेट्रो लाइन टाकली जाते.

मनोहर लाल यांनी सांगितले की, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून मागील १० वर्षांत देशातील मेट्रो सेवा असलेल्या शहरांची संख्या २१ वर गेली आहे. २०१४ मध्ये केवळ ५ शहरांत मेट्रो रेल्वे होती. मोदी सरकारच्या काळात ७०० किलोमीटर नवीन मेट्रो लाइन टाकण्यात आली. देशातील मेट्रो ट्रॅकची लांबी आता ९४५ किलोमीटर झाली आहे.

याशिवाय शुक्रवारी आणखी ३ नव्या प्रकल्पांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. ठाण्याचा इंटेग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प तसेच पुणे आणि बंगळुरातील मेट्रो नेटवर्क यांचा समावेश आहे.

पहिल्या स्थानी कोण?केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी सांगितले की, सध्या मेट्रो रेल्वेच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारत अमेरिकेला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर जाईल. गुरुग्राम, मानेसर आणि धारूहेडा, सोनीपत आणि पानिपत यांना जोडणाऱ्या कॉरिडॉरना लवकरच मंजुरी दिली जाईल. भारत अनेक देशांना मेट्रो उभारणीत मदत  करीत आहे. इस्रायल, सौदी अरेबिया, केनिया व अल् साल्वाडोर आदी देशांनी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनसोबत भागीदारी करण्यात रस दाखवला आहे.  

टॅग्स :मेट्रो