Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या दोन बड्या कंपन्यांचं विलीनीकरण? संपूर्ण प्लॅन तयार; गुंतवणूकदारांना आतापासूनच होतोय फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:35 IST

Railway Companies Merger: सार्वजनिक क्षेत्रातील दोन कंपन्यांचं विलीनीकरण करण्याचा विचार सरकारनं केली असल्याची माहिती समोर येत आहे. पाहा कोणत्या आहेत या कंपन्या.

Railway Companies Merger: सार्वजनिक क्षेत्रातील दोन कंपन्यांचं विलीनीकरण करण्याचा विचार सरकारनं केली असल्याची माहिती समोर येत आहे. या दोन्ही कंपन्या रेल्वेच्या असून, त्यांना एकत्र करून एक मोठी कंपनी तयार केली जाईल, जी जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्यास सक्षम असेल. सध्या या दोन्ही कंपन्या रेल्वेच्या पायाभूत सुविधा (इन्फ्रा) प्रकल्पांसाठी काम करतात आणि विलीनीकरणानंतर त्यांना जागतिक बाजारपेठेतही उतरवले जाऊ शकते. रेल्वेने त्यांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला होता, ज्यावर आता सरकारनेही जवळपास शिक्कामोर्तब केले आहे.

रेल्वे मंत्रालयानं मार्चच्या सुरुवातीला रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) आणि इरकॉन इंटरनॅशनल (Ircon International) यांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला होता. तेव्हापासून दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. आतापर्यंत त्यांच्या स्टॉक्समध्ये १२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. प्रकरणाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, सरकार लवकरच हा प्रस्ताव पुढे नेईल. याच कारणामुळे सध्या इरकॉन इंटरनॅशनलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्तीही पुढे ढकलण्यात आली आहे.

सोन्या-चांदीच्या दरात तुफान तेजी; ₹९००० नं महागली चांदी, चेक करा गोल्ड रेट

काय आहे या विलीनीकरणाचा उद्देश?

रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे की, दोन्ही कंपन्यांना एकत्र करून एक मोठी संस्था तयार केली जाईल, जी जागतिक बाजारपेठेतही स्पर्धा करू शकेल. दोन्ही कंपन्यांच्या कामकाजाचे स्वरूप जवळपास सारखेच आहे, कारण दोन्ही रेल्वेच्या इन्फ्रा प्रकल्पांवर काम करतात. सध्या दोन्ही कंपन्या बांधकाम, कंत्राट, प्रकल्प व्यवस्थापन, हायवे, मेट्रो इत्यादींशी संबंधित कामे करतात. दोन्ही कंपन्यांचे कामकाज समान असल्याने कामात पुनरावृत्ती (Duplicacy) होते. दोन्ही मिळून एक कंपनी बनवल्यास ही सर्व कामे चांगल्या प्रकारे करता येतील. इतकेच नाही तर सध्या देशात 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर'सारखे अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत. यामध्येही दोन्ही कंपन्या स्वतंत्रपणे काम करत आहेत, ज्या विलीनीकरणानंतर अधिक प्रभावीपणे काम करू शकतील.

विलीनीकरणाचे फायदे

एक मोठी भारतीय रेल्वे कंपनी जागतिक बाजारपेठेत चांगली स्पर्धा करू शकते, असं सरकारला वाटतं. जर रेल्वेची मोठी कंपनी असेल तर ती परदेशी टेंडर जिंकण्यात चीन आणि युरोपमधील कंपन्यांना टक्कर देऊ शकेल. सध्या दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या असल्यानं या देशांतील मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत लहान पडतात. सरकारनं ज्याप्रमाणं बँकांचं विलीनीकरण करून मोठ्या बँका तयार केल्या आहेत, त्याच धर्तीवर सरकारी कंपन्यांचा आकारही मोठा आणि मजबूत करण्याची तयारी सुरू आहे. या प्रक्रियेला १ ते २ वर्षांचा वेळ लागू शकतो.

विलीनीकरणाच्या वृत्तामुळे शेअर्समध्ये उसळी

दोन्ही रेल्वे कंपन्यांच्या विलीनीकरणाला वेळ लागणार असला तरी, गुंतवणूकदारांना याचा फायदा आतापासूनच मिळण्यास सुरुवात झाली आहे. विलीनीकरणाच्या बातम्यांमुळे आरव्हीएनएलच्या शेअर्समध्ये आज म्हणजेच २५ मार्च रोजी सुमारे ५ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे आणि तो १२.८५ रुपयांच्या वाढीसह २७१.३० रुपयांवर पोहोचला आहे. तसंच, इरकॉन इंटरनॅशनलच्या शेअर्समध्येही ६.७५ टक्क्यांची वाढ दिसत असून तो सुमारे ७ रुपयांनी वधारून १२५.७४ रुपयांवर पोहोचलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Railway giants merger? Complete plan ready; investors benefit now.

Web Summary : Government considers merging RVNL and Ircon to create a globally competitive railway company. The merger aims to eliminate duplication, enhance efficiency in projects like Dedicated Freight Corridor, and enable better competition against Chinese and European firms. Shares of both companies are already rising.
टॅग्स :रेल्वेसरकार