Join us

अबब... १९५५ मधील कार विकली १,१०० कोटींना! अत्यंत दुर्मीळ अन् वेगवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 09:03 IST

मर्सिडीस-बेंझ ३०० एसएलआर युहलेनहॉट कुपे ही जगातील लिलाव होणारी सर्वांत महागडी कार ठरली आहे.

लंडन : लक्झरी गाड्यांबद्दल बोलायचे झाले तर मर्सिडीज बेंझचे नाव पहिले येते. या जर्मन कार कंपनीच्या एका कारचा नुकताच लिलाव करण्यात आला असून, १९५५ सालची मर्सिडीस-बेंझ कार तब्बल १,१०० कोटी रुपयांना विकली गेली आहे. मर्सिडीस-बेंझ ३०० एसएलआर युहलेनहॉट कुपे ही जगातील लिलाव होणारी सर्वांत महागडी कार ठरली आहे.

यापूर्वीचा विक्रम मोडला

कॅनडास्थित आरएम सॉथेबेज या संस्थेने या कारचा लिलाव केला आहे. याआधीचा सर्वाधिक किमतीचा विक्रम ७० दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे ५४३ कोटी रुपये इतका होता. तो मोडला गेला आहे. ब्रिटिश कार संग्राहक व व्यावसायिक सायमन किडस्टोन यांनी अज्ञात ग्राहकाच्या वतीने ही बोली लावली. किडस्टोन हे या कारसाठी १८ महिन्यांपासून लॉबिंग करीत होते.

अशा किती गाड्या?

५ मे रोजी जर्मनीतील सूटगार्ट येथील मर्सिडीज-बेंझच्या संग्रहालयात अत्यंत गोपनीय पद्धतीने हा लिलाव पार पडला. अत्यंत मोजके कार संग्राहक आणि मर्सिडीज-बेंझ ग्राहकांनाच या लिलावाचे निमंत्रण होते. ३०० एसएलआर युहलेनहॉट कुपे या मॉडेलच्या केवळ २ गाड्यांची निर्मिती १९५५ मध्ये करण्यात आली होती. विशेष म्हणजे या दोन्ही गाड्या मर्सिडीज-बेंझच्याच मालकीच्या आहेत. त्यातील एक कार आता विकली गेली आहे.

- अत्यंत दुर्मीळ असलेली ही कार मर्सिडीजच्या रेस डिपार्टमेंटने निर्माण केली होती. 

- कंपनीचे मुख्य अभियंता रुडॉल्फ युहलेनहॉट यांच्या नावावरून तिचे नामकरण करण्यात आले होते. 

- या गाडीला ३.० लिटरचे मोठे इंजिन आहे. ती ताशी १८० कि. मी. वेगाने धावू शकते. त्यावेळच्या सर्वाधिक वेगवान गाड्यांपैकी ती एक होती.

टॅग्स :मर्सिडीज बेन्झ