Mark Mobius Prediction: प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि उदयोन्मुख बाजारपेठांची उत्तम जाण असलेले मार्क मोबियस यांनी भारतावर मोठा विश्वास व्यक्त केला आहे. मोबियस कॅपिटल पार्टनर्स एलएलपीचे संस्थापक यांच्या मते, अमेरिकेनं भारतीय निर्यातीवर शुल्क लादलं असूनही भारत अजूनही जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. मोबियस यांनी त्यांच्या पोर्टफोलिओचा सुमारे २०% हिस्सा भारतात गुंतवला आहे. ते भारताबद्दल उत्साहित आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की भारताचा मजबूत देशांतर्गत विकास दर, उद्योजकता आणि सरकारनं राबवलेल्या सुधारणांमुळे भारत इतर उदयोन्मुख बाजारपेठांपेक्षा पुढे आहे. "भारतीय उद्योजक खूप जुळवून घेणारे आणि सर्जनशील आहेत. ते शुल्कामुळे होणारे नुकसान कमी करण्याचे मार्ग शोधतील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
ट्रम्प प्रशासनानं अलीकडेच भारतावर शुल्क लादलं आहे. याचा प्रामुख्याने औषध निर्माण, रत्नं आणि दागिने, तसंच वस्त्रोद्योग यासारख्या क्षेत्रांवर परिणाम होईल. "अनेक उत्पादक आता आफ्रिका आणि इतर देशांमध्ये पर्यायी प्रोडक्शन बेस शोधत आहेत. या देशांमध्ये अमेरिकेचं शुल्क कमी आहे. भारतीय निर्यातदार सर्जनशील आहेत. ते त्याचा प्रभाव कमी करण्याचे मार्ग शोधतील," असं इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मोबियस म्हणाले.
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
टॅरिफचा फारसा परिणाम होणार नाही
निर्यातीवर काहीसा परिणाम होईल, यावर मोबियस यांनी भर दिला. परंतु, भारतातील देशांतर्गत बाजारपेठ झपाट्यानं वाढत आहे. यामुळे एकंदर आर्थिक परिणाम कमी होण्यास मदत होईल. त्यांचा अंदाज आहे की भारताचा जीडीपी विकास दर थोडा कमी असू शकतो. तो ६ टक्क्यांवरून ५.५ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो. मात्र, विकासाचा हा वेग दीर्घकाळ कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शुल्काच्या प्रभावामुळे आर्थिक विकास दर ०.५% ते ०.७५% पेक्षा जास्त कमी होणार नाही असं म्हणत भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चेची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मोबियस यांनी अनेक संभाव्य परिस्थितींबद्दल सांगितलं. यामध्ये कच्च्या तेलाची आयात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भारत अजूनही रशियाकडून तेल खरेदी करत आहे. चीनलाही अशाच दबावाला सामोरं जावं लागत आहे. ब्रेंट क्रूडच्या घसरत्या किमती आणि कमकुवत रुपया यामुळे भारतीय निर्यातदारांवरील तात्काळ दबाव कमी होऊ शकतो. ब्रेंट क्रूडचा भाव सध्या ६५ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे. कमकुवत रुपयामुळे डॉलरच्या तुलनेत निर्यात अधिक स्पर्धात्मक होईल. याशिवाय बाधित उद्योगांना आधार देण्यासाठी भारत सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत.
चीनची बाजी, परंतु भारत...
मोबियस यांना भारताच्या दीर्घकालीन गुंतवणुकीच्या आकर्षणाचा विश्वास आहे. अलीकडेच चीनच्या शेअर बाजारानं भारताला मागे टाकलंय. परंतु मोबियस यांचा असा विश्वास आहे की भारताचा उच्च विकास दर आणि उद्योजकता जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक स्थान बनवतं. येत्या तीन ते चार महिन्यांत परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कारण व्यापाराचे वाद अंशत: सुटतील. याव्यतिरिक्त, सरकारकडून नोकरशाही कमी करणं आणि देशांतर्गत उत्पादकांवरील निर्बंध शिथिल करण्याच्या उद्देशानं केलेल्या सुधारणांमुळे दीर्घकालीन कार्यक्षमता आणि नफा वाढण्याची अपेक्षा आहे. या उपायांमुळे व्यवसायांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल, असंही ते म्हणाले.
मोबियस यांनी भारत ही आपली सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचा पुनरुच्चार केला. भक्कम पायाभूत तत्त्वं आणि दीर्घकालीन क्षमता यांचा त्यांनी उल्लेख केला. अल्पावधीत बाजारातील अस्थिरतेची चिंता नसल्याचं त्यांनी सांगितलं. गुंतवणुकीसाठी भारत हे उत्तम ठिकाण आहे. तात्पुरत्या धक्क्यांमध्येही भारताची आर्थिक लवचिकता आणि सक्रिय धोरणनिर्मिती परकीय भांडवलाला आकर्षित करत राहील, असा त्यांचा विश्वास आहे.