Join us

जीएसटीच्या महसुलात महाराष्ट्राचा वाटा अव्वल; ९ टक्के वाढीसह २१,४०३ कोटींचे योगदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 06:00 IST

सप्टेंबर २०२२मध्ये जमा झालेल्या एकूण जीएसटी महसुलात महाराष्ट्राचा वाटा सर्व राज्यांमध्ये जास्त आहे.

हरिश गुप्ता,  लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सप्टेंबर २०२२मध्ये जमा झालेल्या एकूण जीएसटी महसुलात महाराष्ट्राचा वाटा सर्व राज्यांमध्ये जास्त आहे. महाराष्ट्राचे योगदान २१,४०३ कोटी रुपयांचे असून, त्यापाठोपाठ कर्नाटकचे योगदान कितीतरी कमी ९,७६० कोटी, तमिळनाडूचे ८,६३७ कोटी, हरयाणाचे ७,४०३ कोटी व उत्तरप्रदेशचे योगदान ७,००४ कोटी रुपयांचे आहे. सप्टेंबर महिन्याचे एकूण जीएसटी संकलन सर्वाधिक १,४७,६८६ कोटी रुपये आहे. त्यापैकी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा वाटा १,०५,६१५ कोटींचा आहे. सप्टेंबर २०२१ पेक्षा हा आकडा २२ टक्के जास्त आहे.

महाराष्ट्राने २९ टक्के जीएसटीत वाढ नोंदविली असून, ती मागील महिन्यांच्या तुलनेत सर्वोच्च आहे. या महिन्यात आयात वस्तूंवरील महसुलात ३९ टक्के वाढ झाली. देशांतर्गत व्यवहारांचा महसूल (सेवांच्या आयातीसह) मागील वर्षीच्या याच महिन्यापेक्षा २२ टक्के जास्त होता. मागील सलग आठ महिन्यांत जीएसटी महसूल १.४ लाख कोटींवर राहिलेला आहे. आणि यापुढेही हाच क्रम राहील, असा अंदाज आहे. ऑगस्ट २०२२मध्ये ७.७ कोटी ई- वे बिल तयार झाले. जुलै २०२२ पेक्षा ते ७.५ कोटींनी जास्त आहेत.

जीएसटी पोर्टल दोषमुक्त 

सप्टेंबर महिन्यात २० रोजी एका दिवसातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक संकलन ४९,४५३ कोटी रुपये नोंदविण्यात आले होते. जीएसटीएनचे जीएसटी पोर्टल पूर्णपणे स्थिरावले आहे व ते दोषमुक्त आहे, हेच यावरून दिसते, असा दावा वित्त मंत्रालयाने केला आहे. सप्टेंबरमध्ये आणखी एक मैलाचा दगड पार करण्यात आला. १.१ कोटी ई-वे बिल आणि ई-इनव्हॉईसेस एकत्रितरीत्या (७२.९४ लाख ई-इनव्हॉईसेस आणि ३७.७४ लाख ई-वे बिल्स) कोणत्याही दोषाशिवाय एनआयसीच्या पोर्टलवरून ३० सप्टेंबर २०२२ रोजी काढण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :जीएसटी