PM Vishwakarma Yojana: भारतातील पारंपारिक कारागीर आणि शिल्पकार हे आपल्या समाजाचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा मानले जातात. सर्वच कारागिरांनी केवळ दैनंदिन गरजा पूर्ण केल्या नाहीत तर भारतीय संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवल्या आहेत. दरम्यान, आधुनिक काळात, या व्यवसायातील लोकांना अनेकदा आर्थिक अडचणी, संसाधनांचा अभाव आणि ओळखीचा अभाव यांचा सामना करावा लागतो. या आव्हानांना तोंड देत, मोदी सरकारनं १७ सप्टेंबर २०२३ रोजी पंतप्रधान विश्वकर्मा योजना (पीएम विश्वकर्मा योजना) सुरू केली.
५% व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज
या योजनेअंतर्गत, कारागिरांना फक्त ५% व्याजदरानं असुरक्षित कर्ज (दोन टप्प्यात ३ लाख रुपयांपर्यंत) मिळतं. सोबतच १५,००० रुपयांचं आधुनिक टूलकिट, प्रशिक्षणादरम्यान दररोज ५०० रुपये स्टायपेंड आणि ओळखपत्र म्हणून पंतप्रधान विश्वकर्मा प्रमाणपत्र देखील मिळतं. सरकार या 'विश्वकर्मांना' केवळ रोजगारच नाही तर आदर आणि मान्यता देखील प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतं, जेणेकरून त्यांचे कौशल्य भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि 'स्थानिक ते जागतिक' स्वप्न साकार करता येईल.
अधिक माहिती काय?
या योजनेत लोकांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. हे कर्ज केवळ ५ टक्के व्याजदरानं दिलं जातं. योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाखांचं कर्ज दिलं जातं. या योजनेत १८ पारंपारिक कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्याअंतर्गत लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिलं जातं.
या योजनेत लोकांना १८ पारंपारिक कौशल्य व्यवसायांचं प्रशिक्षण दिलं जातं, ज्यामध्ये दरमहा ५०० रुपये विद्यावेतन दिलं जातं. १८ ते ५० वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
अर्ज कसा करावा?
पीएम विश्वकर्मा योजनेत अर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in जाऊन केला जाऊ शकतो. त्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँकेचं पासबुक आणि मोबाइल क्रमांक आवश्यक आहे.