Join us

Sanjeev Bajaj at LMOTY 2025: "आमचा केवळ मेक इन इंडियावरच नाही तर, मेक बाय इंडिया फॉर इंडियावरही विश्वास," अलियान्झबाबतच्या भागीदारीवर काय म्हणाले संजीव बजाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 19:16 IST

Sanjiv Bajaj on Allianz Partnership at LMOTY 2025: बजाज फिनसर्व्हनं आपल्या विमा कंपनीमधील आलियान्झचा २६ टक्के हिस्सा पूर्णपणे विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी मोठं वक्तव्य केलं.

LMOTY 2025: बजाज फिनसर्व्हनं आपल्या विमा कंपनीमधील आलियान्झचा २६ टक्के हिस्सा पूर्णपणे विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार २४,१८० कोटी रुपयांचा होणार आहे. यानंतर बजाज फिनसर्व्हच्या, बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्स आणि बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्स या पूर्णपणे भारतीय मालकीच्या कंपन्या बनतील. भारतीय विमा क्षेत्रातील हा सर्वात मोठा करार मानला जात आहे. यावर बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी मोठं वक्तव्य केलं.  

बुधवारी मुंबईतील राजभवनात लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५ हा सोहळा पार पडला. यावेळी लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांच्याशी अनेक मुद्द्यांवर संवाद साधला. यादरम्यान त्यांनी बजाज यांना नुकत्याच आलियान्झसोबतच्या भागीदारीतून बाहेर पडण्याच्या घेतलेल्या निर्णयावर प्रश्न विचारला. बजाज अलियान्झसोबतचा प्रवास २००१ झाला. भारत प्रत्येक क्षेत्रासाठीच महत्त्वाची बाजारपेठ आहे. आर्थिक सेवांच्याबाबतीतही तेच आहे. दोन्ही ब्रँडचे आपल्या महत्त्वाकांक्षा आहेत. बजाजकडे ७४ टक्के हिस्सा होता आणि अलियान्झकडे  २४ टक्के होतं. दोघांनाही आपले व्यवसाय भविष्यात मोठे करायचे आहेत. दोन कॅप्टन्स एकच बोट चालवू शकत नाहीत. असं केलं त्या बोटीचं काय होईल याचा अंदाज येऊच शकतो. त्यानंतर आम्ही ठरवलं त्यांचा हिस्सा विकत घ्यायचा. त्यांची पुढील वाटचाल काय असेल हे तुम्ही त्यांच्याकडून ऐकालच," असं बजाज यावेळी म्हणाले.

जिओसोबतच्या चर्चांवर काय म्हणाले बजाज?

यावेळी त्यांना अलियान्झ जिओसोबत जाऊ शकतं अशाप्रकारची वृत्तही समोर येत असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावरही बजाज यांनी मनमोकळेपणानं उत्तर दिलं. "इन्शुरन्सची स्पेस ही अतिशय मोठी आहे. यामध्ये जवळपास ५० कंपन्या आहेत. अलियान्झ आजही आमचे पार्टनर आहेत. आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याला नियामकाच्या काही मंजुरींची आवश्यकता आहे. येत्या काही महिन्यात त्या पूर्ण होतील. ते कोणाबरोबर भागीदारी करतील हे येत्या काळात स्पष्ट होईलच," असं ते म्हणाले.

भारतात उत्तम संधी

"भारतात चांगल्या संधी आहेत. २००७ मध्ये मी बजाज ऑटोमधून बाहेर आलो आणि आर्थिक सेवांची सुरूवात झाली. सुरुवातीला फारच त्याची व्याप्ती छोटी होती. आमचा प्रवास हा रोमांचक आहे. भारतातून जागतिक दर्जाची कंपनी सुरू करण्याची आमची इच्छा होती. आम्ही केवळ मेक इन इंडियावरच नाही तर, मेक बाय इंडिया फॉर इंडियावरही विश्वास ठेवतो, म्हणूनच आम्ही आमच्या भागीदाराचा हिस्साही विकत घेण्याचा निर्णय घेतला," असं बजाज म्हणाले.

टॅग्स :व्यवसायलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025जिओलोकमत इव्हेंट