Join us

निर्बंध उठत चालल्यामुळे वाहन उद्योग टाकणार ‘गिअर’!, कोरोनाची लाट ओसरण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 06:37 IST

automotive industry : उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक वाहन बाळगण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळे वाहनांचे बुकिंग वाढले आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे देशाच्या अनेक भागातील लॉकडाऊन आणि निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता देशातील प्रवासी वाहन उत्पादकांनी उत्पादन क्षमता वाढविण्याची तयारी केली आहे.उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक वाहन बाळगण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळे वाहनांचे बुकिंग वाढले आहे.

सध्या बहुतांश डीलरांकडील साठा केवळ एक महिनाभर पुरेल इतकाच आहे. त्यामुळे कंपन्यांनी उत्पादन वाढविण्याची जय्यत तयारी केली आहे. कोविड-१९ ची साथ ओसरल्यानंतर ऑगस्टमध्ये वाहन विक्री पूर्णत: सुधारलेली असण्याची शक्यता आहे, अशी कंपन्यांची अपेक्षा आहे.

याशिवाय यंदा रब्बी हंगाम उत्तम राहिल्यामुळे ग्रामीण तसेच निमशहरी भागातील मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्स यांसारख्या कंपन्यांना त्याचा लाभ होईल.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ऑगस्टनंतर बाजार उसळी घेईल, असा वाहन कंपन्यांचा अंदाज आहे.

कामाचे तास वाढवून अधिक उत्पादनदेशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी जूनमध्ये १,६५,००० ते १,६९,००० वाहनांचे उत्पादन करीत आहे. जुलैमध्ये ते वाढवून १,७४,००० वर नेले जाईल. एप्रिलमध्ये कंपनीने १,५७,५८५ वाहनांचे उत्पादन केले होते.टाटा मोटर्स जुलैपर्यंत आपल्या प्रवासी वाहनांचे उत्पादन २५,००० ते ३०,००० वर नेणार आहे. ह्युंदाईचे जूनमधील उत्पादन ४७,००० ते ४८,००० वाहने इतके होते. कंपनी तिसरी शिफ्ट सुरू करून उत्पादन वाढविणार आहे. कंपनीचे एप्रिलमधील उत्पादन ५७,१०० वाहने इतके होते.

टॅग्स :व्यवसायवाहन उद्योग