Join us
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर! येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 13:26 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किमतीत सातत्यानं घट होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किमतीत सातत्यानं घट होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचा दर 74 डॉलर प्रतिबॅरलवरून कमी होऊन 70 डॉलर प्रति बॅरलवर आला आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर घटण्याची शक्यता आहे. जगातली सर्वात मोठी रिसर्च फर्म बँक ऑफ अमेरिकेच्या मते, सौदी अरबकडून कच्च्या तेलाचं उत्पादन वाढण्याची शक्यता असून, पुरवठाही वाढणार आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव 70 डॉलर प्रति बॅरलच्याही खाली येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या भावात घट झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊन सामान्य लोकांना मोठा फायदा पोहोचणार आहे. 

  • पेट्रोल-डिझेल म्हणून होईल स्वस्त- बँक ऑफ अमेरिकेच्या मते, जागतिक वाढीचा अंदाज घटल्यामुळे कच्च्या तेलाची मागणी कमी होऊ शकते. त्यामुळे तेलाच्या किमतीवर दबाव निर्माण होईल. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या ट्रेड वॉरमुळेही तेलाच्या किमती पडू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत कच्चा तेलाचे दर 70 डॉलर प्रतिबॅरलच्या खाली येऊ शकतात. गेल्या महिन्याभरात पेट्रोलचे दर 72 रुपये प्रतिलिटर ते 78 रुपये प्रतिलिटरच्या जवळपास आहे. तर डिझेलचा दर 69च्या आसपास आहे. जर कच्च्या तेलाचे दर 70 डॉलर प्रतिबॅरलच्या खाली आल्यास पेट्रोल-डिझेलचे दर 1 ते 2 रुपयांनी स्वस्त होऊ शकते. आपल्या गरजेचं जवळपास 80 टक्के कच्च तेल हे विदेशातून खरेदी केलं जातं. अशातच कच्च्या तेलाच्या किमती पडल्यास करंट अकाउंट डेफिसिट (CAD)मध्ये घट होणार आहे. त्यामुळे भारतालाही कमी दरानं हे कच्च तेल मिळणार आहे. 
  • देशाच्या आर्थिक वृद्धीवर पडतो फरक- इकोनॉमिक सर्व्हेनुसार, क्रूड ऑइलच्या किमती 10 डॉलरनं वाढल्यास करंट अकाउंट डेफिसिट (CAD) 100 कोटी डॉलरनं वाढतो. त्यामुळे आर्थिक वृद्धीत 0.2 ते 0.3 टक्के कमी येते. म्हणजे कच्चे तेल स्वस्त झाल्यास त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा पोहोचतो. 
टॅग्स :पेट्रोल पंपतेल शुद्धिकरण प्रकल्पपेट्रोलडिझेल