Lahori Zeera Business Model: एका छोट्या कंपनीने कोल्ड्रिंक मार्केटमध्ये एन्ट्री घेतली आणि काही वर्षांतच मोठं यश मिळवलं. हे नाव इतकं वेगळं होतं की ज्यानं ते पहिल्यांदा ऐकलं त्याला प्रश्न पडला की ही भारतीय कंपनी आहे की पाकिस्तानी. हो, आम्ही 'लाहोरी जीरा' बद्दल सागत आहोत. लाहोरी जीरा हे एक असं उत्पादन आहे जे अतिशय कमी कालावधीत हिट झालं. त्याची चव आणि कमी किमतीमुळे त्याची लोकप्रियता वाढली. आता, हा ब्रँड देशभरात लोकप्रिय झालाय.
खरं तर, लाहोरी जीरा आज भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक विक्री होणारा पेय ब्रँड आहे. ही कंपनी सुरू होऊन फक्त आठ वर्षे झाली आहे. लाहोरी जीराची स्थापना २०१७ मध्ये पंजाबमधील सौरभ मुंजाल, निखिल डोडा आणि सौरभ भुतना या चुलत भावांनी केली होती. लाहोरी जीरा ही या तिन्ही भावांची कल्पना आहे. त्यांनी चंदीगडमधील त्यांच्या स्वयंपाकघरातून हा 'देसी पेय' ब्रँड सुरू केला.
तीन भावांना सूचली कल्पना
सौरभ मुंजाल, सौरभ भुतना आणि निखिल डोडा यांनी २०१७ मध्ये आर्चियन फूड्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली, ज्या अंतर्गत लाहोरी जीरा ब्रँड विकला जातो. कंपनीचे सीईओ सौरभ मुंजाल यांनी लाहोरी जीरामध्ये कोणतंही केमिकल नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यात तुमच्या स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या पदार्थांचा समावेश असतो. ते म्हणतात की लाहोरी जीरा हे नाव लाहोरी मीठ (रॉक सॉल्ट) वापरल्यामुळे ठेवलं आहे. कंपनीच्या सर्व उत्पादनांमध्ये लाहोरी मीठ वापरलं जातं.
"आम्ही १४० कोटी भारतीयांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य ठेवलं होतं आणि कमाल किंमत १० रुपये निश्चित केली होती. उदाहरणार्थ, ५ रुपयांचं पारले-जी बिस्किट आज प्रत्येक घरात लोकप्रिय आहे," असं मुंजाल म्हणाले. एका सर्वेक्षणानुसार, कंपनीच्या विक्रीपैकी जवळजवळ ५०% विक्री थेट क्रेट खरेदीतून होते. फक्त १० रुपयांची किंमत आणि त्याची चव इतकी लोकप्रिय झाली आहे की लोक आता केवळ एक-एक बॉटल नव्हे तर संपूर्ण क्रेट खरेदी करतात आणि त्यांच्या कुटुंबासह ते पितात. कंपनी वार्षिक ५०% पेक्षा जास्त दरानं वाढत आहे.
मार्केटिंगसाठी नवा फंडा
लाहोरी जीरा हा बिस्लेरीच्या हायपरलोकल मॉडेलवर चालत आहे.ज्यामध्ये कंपनी आपला उत्पादन प्रकल्प सुरू करण्याऐवजी तेजीनं ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी दुसऱ्या बॉटलर्ससोबत काम करत आहे. गेल्या आठ वर्षांतच कंपनीनं या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. विक्री सातत्यानं वाढत आहे आणि नफाही वाढत आहे. लाहोरी जीराबद्दल लोकांची आवडही वाढत आहे. २०२१ मध्ये तिची उलाढाल फक्त ₹८० कोटी होती. त्यानंतरच्या वर्षी, २०२२ मध्ये ती ₹२५० कोटी झाली. २०२३-२४ या आर्थिक वर्षात कंपनीने अंदाजे ₹३१२ कोटी महसूल नोंदवला. आर्थिक वर्ष २५ मध्ये कंपनीने ₹५०० कोटींचं निव्वळ महसूल लक्ष्य ठेवण्यात आलंय.
२८०० कोटींपर्यंत मूल्यांकन
लाहोरी जीरा ब्रँडची किंमत सध्या सुमारे ₹२,६००-₹२,८०० कोटी आहे. सध्या, लाहोरी जीराला १८ राज्यांमध्ये मोठी मागणी आहे, ५,००,००० हून अधिक किरकोळ दुकानांमध्ये त्याची विक्री होते. काही वर्षांपूर्वीपर्यंत, हा ब्रँड पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशपुरता मर्यादित होता.