Join us

'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:44 IST

Karachi Bakery : जर तुम्ही कधी हैदराबादला गेला असाल तर तुम्ही कराची बेकरी हे नाव नक्की ऐकलं असेल. भारत पाकिस्तान तणावादरम्यान लोक या बेकरीविरोधात आंदोलन करत आहेत.

Karachi Bakery : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. भारताच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सर्वसामान्य भारतीय आता रस्त्यावर उतरुन पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने करत आहेत. यात पुन्हा एकदा तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील कराची बेकरीला लक्ष्य करण्यात आलं. कराची हे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एक शहर आहे. त्यामुळे लोक याचा विरोध करत असून बेकरीच्या नावाशेजारी भारतीय तिरंगा लावण्यात आले आहेत. पण, खरच कराची बेकरी आणि पाकिस्तानचा काही संबंध आहे का? या बेकरीचा इतिहास काय आहे? चला जाणून घेऊाय.

कराची बेकरी विरोधात आंदोलन का?मूळच्या हैदराबाद येथील कराची बेकरी ब्रँडच्या देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये शाखा आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, कराची बेकरीच्या विशाखापट्टणम शाखेबाहेर निदर्शने करण्यात आली. काही लोक त्याला पाकिस्तानी ब्रँड म्हणत असून त्याचे नाव बदलण्याची मागणी करत आहेत. यानंतर, कराची बेकरीचे मालक राजेश रामनानी आणि हरीश रामनानी यांनी पुढे येत याचे सत्य सांगितले आहे. ते म्हणाले की हा १००% भारतीय ब्रँड आहे. त्यांच्या आजोबांनी ७३ वर्षांपूर्वी त्याची स्थापना केली.

बेकरीला कराची हे नाव का दिलं?'कराची बेकरी' १९५३ मध्ये खानचंद रामनानी नावाच्या एका सिंधी हिंदू कुटुंबाने सुरू केली होती. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब कराची, पाकिस्तानहून हैदराबादला आले. यामुळे त्यांनी त्यांच्या बेकरीचे नाव 'कराची' ठेवले. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत व्हिडीओ शेअर केला आहे. यात बेकरी मालक रामनानी म्हणतात की "कराची बेकरीची स्थापना माझे आजोबा खानचंद रामनानी यांनी केली आहे. ते फाळणीच्या वेळी भारतात आले होते. त्याला ७३ वर्षे झाली आहेत.

वाचा - 'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण

यापूर्वी देखील कराची बेकरीविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. या घटनेनंतर बेकरीच्या मालकांनी सरकारकडे मदत मागितली आहे. लोकांनी आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे. लोक शहरातील बेकरी आउटलेटवर तिरंगा लावत आहेत. कराची बेकरी हा पूर्णपणे भारतीय ब्रँड असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :ऑपरेशन सिंदूरपहलगाम दहशतवादी हल्लातेलंगणापाकिस्तान