Join us  

देशात सर्वाधिक पगार कोणत्या राज्यात मिळतो? महाराष्ट्रात काय स्थिती? अशी आहे आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 7:46 AM

Employments: भारतात पुरुष कामगारांना सर्वाधिक पगार दिल्लीत मिळत असून, येथे महिन्याकाठी सरासरी १४,११५ रुपये मिळत आहेत. महाराष्ट्रात मात्र पुरुष कामगारांना सरासरी ७,४३७ रुपये तर महिलांना ५,४३१ रुपये पगार मिळतो

- चंद्रकांत दडसनवी दिल्ली - भारतात पुरुष कामगारांना सर्वाधिक पगार दिल्लीत मिळत असून, येथे महिन्याकाठी सरासरी १४,११५ रुपये मिळत आहेत. महाराष्ट्रात मात्र पुरुष कामगारांना सरासरी ७,४३७ रुपये तर महिलांना ५,४३१ रुपये पगार मिळत असून, पगाराबाबत महाराष्ट्र सर्व राज्यांच्या तुलनेत १८व्या स्थानावर असल्याचे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालातून समोर आले आहे.

महाराष्ट्रात २००५ मध्ये पुरुष कामगारांना १,०४४ रुपये वेतन मिळत होते. त्यानंतर २०१२ मध्ये यात ३,१५७ रुपये, २०१९ मध्ये ५,४४५ रुपये अशी वाढ होत गेली. महिलांना वेतन देण्यात महाराष्ट्र देशात २२ व्या नीचांकी स्थानावर असून, हिमाचल प्रदेशात सर्वाधिक ११,०५५ रुपये  पगार आहे. 

महाराष्ट्रात महिलांना २००५ मध्ये ६६४ रुपये, २०१२ मध्ये २,२८२ रुपये, २०१९ मध्ये ३,४९८ रुपये पगार होता. महाराष्ट्रातील महिलांच्या पगारात २०१२ मध्ये वाढ होत राज्याचे स्थान देशात १५ व्या स्थानी होते. मात्र, ते पुन्हा २२ व्या स्थानावर घसरले आहे. महाराष्ट्र दारिद्र्यरेषेखालील लोकांना स्वयंरोजगार देण्यात तळाला असल्याचे अहवालात दिसते.

सुशिक्षित तरुण बेरोजगार कुठे?- देशात १५ ते २९ वयोगटादरम्यानच्या सुशिक्षित तरुणांचा बेरोजगारीचा दर सर्वाधिक ओडिशामध्ये असून, तेथे ४० टक्के तरुण बेरोजगार आहेत.- महाराष्ट्रामध्ये १५ ते २९ वयोगटादरम्यानच्या सुशिक्षित तरुण बेरोजगारांची संख्या १५% आहे. अहवालानुसार महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण या गटात तुलनेत कमी आहे. - १५ ते २९ वयोगटादरम्यानच्या सुशिक्षित तरुणांना सर्वाधिक नोकरीची संधी सध्या गुजरातमध्ये असल्याचे दिसून येते.

टॅग्स :कर्मचारीनोकरीभारत