Join us

आज होणार जीत अदानी आणि दिवा शाह यांचा विवाह, काय काय असेल खास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 10:59 IST

Jeet Adani Diva Shah Wedding: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी हिरे व्यापारी जैमिन शाह यांची मुलगी दिवा शाह हिच्यासोबत आज विवाहबंधनात अडकणार आहे.

Jeet Adani Diva Shah Wedding: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी हिरे व्यापारी जैमिन शाह यांची मुलगी दिवा शाह हिच्यासोबत आज विवाहबंधनात अडकणार आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. दुपारी दोन वाजता कार्यक्रमांना सुरुवात होईल. जैन आणि गुजराती परंपरेनुसार हा विवाह सोहळा पार पडेल. लग्नाचे सर्व कार्यक्रम अदानी टाऊनशिपमधील शांतीग्राम येथे होणारेत.

साधेपणानं होणार विवाह

गौतम अदानी यांनी यापूर्वी सांगितलं होतं की, आपल्या मुलाचा विवाह साधेपणानं होईल आणि सर्व कार्यक्रम परंपरेचं पालन करून केले जातील. या विवाहसोहळ्यात बॉलिवूड स्टार्सचा आवाज ऐकू येणार नाही. गौतम अदानी यांच्या या वक्तव्यानंतर अनेक कयास आणि अफवांना पूर्णविराम मिळाला. यापूर्वी माध्यमांमध्ये या विवाहसोहळ्याला आंतरराष्ट्रीय कलाकार उपस्थित राहू शकतात, असा दावा केला जात होता. यासाठी प्रसिद्ध गायकाला भरमसाठ फी देण्यात आली असल्याचंही काहींनी म्हटलं होतं.

परंतु गौतम अदानी यांनी महाकुंभातील त्रिवेणी संगमावर कुटुंबासमवेत पूजा केल्यानंतर असं काहीही नसल्याचं सांगितले. आपलं संगोपन आणि कार्यशैली पूर्णपणे वर्किंग क्लास प्रमाणेच आहे. यात जीत यांचाही समावेश आहे आणि हा विवाह सोहळा साधेपणानं पार पडेल आणि पारंपारिक पद्धतीने पार पडेल, असं त्यांनी सांगितलं.

कसा खास असेल विवाह?

जीत आणि दिवा यांचा विवाह पूर्णपणे लो प्रोफाईल ठेवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी यात देशाच्या विविध भागातून कलाकार येऊ शकतात. ज्यामुळे संपूर्ण सोहळ्यात भारतीयत्वाची झलक पाहायला मिळेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या निमित्तानं भारतीय संस्कृतीची झलकही पाहायला मिळणार आहे. या लग्नात पाहुण्यांना देण्यासाठी नाशिक आणि महाराष्ट्रातून पैठणी साड्या तयार करण्यात आल्यात. तर जोधपूरच्या बिबाजी बांगड्या विक्रेत्याच्या पारंपारिक बांगड्याही या लग्नात पाहायला मिळणारेत.

टॅग्स :गौतम अदानीअदानी