Join us
Daily Top 2Weekly Top 5

6000 रुपये होता पगार, लग्नासाठी घ्यावं लागलं कर्ज; आता 55 हजार कोटींच्या कंपनीचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 16:45 IST

चांगली नोकरी सोडून त्यांनी स्वतःचा स्टार्टअप सुरू केला आणि त्यांना इतकं यश मिळालं की आता ते इतरांना नोकरी देत ​​आहेत.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या आणि कठीण परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या जयंती कानानी यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज कनानी 55,000 कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. चांगली नोकरी सोडून त्यांनी स्वतःचा स्टार्टअप सुरू केला आणि त्यांना इतकं यश मिळालं की आता ते इतरांना नोकरी देत ​​आहेत.

एक काळ असा होता की जयंती कनानी यांचे कुटुंब अहमदाबादमध्ये एका छोट्या फ्लॅटमध्ये राहत होते. त्यांचे वडील हिऱ्याच्या कारखान्यात काम करायचे. वडिलांनी आपल्या मुलाला मोलमजुरी करून शिकवलं. कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमध्ये जयंती यांनी कॉम्पुटर सायन्समध्ये बी.टेक पूर्ण केलं. आपलं  शिक्षण पूर्ण होताच त्यांनी काम करायला सुरुवात केली.

शिक्षणानंतर जयंती कनानी यांना नोकरी लागली, जिथे त्यांना पहिला पगार म्हणून फक्त 6,000 रुपये मिळाले. या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण असल्याने अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी ते नोकरीनंतरही घरूनच काही प्रोजेक्टवर काम करायचे. नोकरी आणि पार्ट टाईम इन्कम मिळाल्यावरही ते जास्त पैसे कमवू शकले नाहीत. लग्नासाठी देखील त्यांना कर्ज घ्यावं लागलं.

जयंती यांच्या कारकिर्दीत एक टर्निंग पॉइंट आला जेव्हा ते एका कंपनीत डेटा एनिलिस्ट म्हणून काम करत असताना संदीप नेलवाल आणि अनुराग अर्जुन यांच्यासोबत भेट झाली. विशेष म्हणजे तिघांचेही उद्दिष्ट पैसे कमावणे हे होतं आणि त्यासाठी त्यांना काहीतरी मोठं करायचं होतं. त्यानंतर या तिघांनी मिळून 2017 मध्ये पॉलीगॉन सुरू केलं. 

सुरुवातीला त्याचं नाव मॅटिक असं होतं. कंपनीने अवघ्या 6 वर्षात प्रचंड यश मिळवलं. डीएनएच्या रिपोर्टनुसार, कंपनीची सध्याची व्हॅल्यू 55,000 कोटी रुपये आहे. पॉलीगॉनला प्रसिद्ध अमेरिकन गुंतवणूकदार आणि शार्क टँकचे जज मार्क क्यूबन यांच्याकडूनही फंडिंग मिळालं आहे.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी