jamsetji tata death anniversary : देशात अनेक उद्योगपती आहेत, पण 'टाटा' हे नाव जेवढं आदराने घेतलं जातं तेवढं क्वचितच दुसरं घेतलं जात असेल. आज मीठापासून प्रवासी विमानापर्यंत अनेक क्षेत्रात टाटा समूहातील कंपन्यांचे वर्चस्व पाहायला मिळते. मात्र, याची सुरुवात कशी झाली माहिती आहे का? आज टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांची पुण्यतिथी आहे. ज्यांनी लावलेल्या एका छोट्या रोपट्याचे रुपांतर आज महाकाय वटवृक्षात झालं आहे. पण तुम्हाला माहित आहे का, जमशेदजींनी आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात कशाने केली? यामध्ये अनेकदा त्यांना अपयशही झाले.
टाटांची पहिली कंपनी कोणती?जमशेदजी टाटा यांचा जन्म १८३९ मध्ये गुजरातमध्ये झाला. त्यांचे वडील नुसेरवानजी टाटा यांनी कुटुंबातील पारंपरिक पुजारी व्यवसायाला फाटा देत व्यवसायात प्रवेश केला होता. जमशेदजींनीही वडिलांकडून प्रेरणा घेतली. वयाच्या १४ व्या वर्षी ते वडिलांना मुंबईत मदत करू लागले आणि तिथेच त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर जवळपास १० वर्षांनी, १८६८ मध्ये जमशेदजींनी स्वतःचा पहिला व्यवसाय सुरू केला. त्यांनी २१,००० रुपयांची गुंतवणूक करून एक ट्रेडिंग कंपनी उघडली. यानंतर ते इंग्लंडला गेले आणि कापड व्यवसायाची माहिती घेऊन भारतात परतले.
१८६९ मध्ये जमशेदजींनी खऱ्या अर्थाने कापड व्यवसायात प्रवेश केला. मुंबईच्या चिंचपोकळी भागातील एक बंद पडलेली तेल गिरणी त्यांनी विकत घेतली आणि तिचे नाव 'अलेक्झांड्रा मिल' ठेवले. त्यांनी या तेल गिरणीला एका कापड गिरणीत रूपांतरित केले आणि दोन वर्षांत ती एका स्थानिक व्यावसायिकाला विकून चांगला नफा कमावला.
मुंबई कापड गिरण्यांचे केंद्र बनले असताना, जमशेदजींनी अधिक नफा मिळवण्यासाठी दूरदृष्टी दाखवली. त्यांनी १८७४ मध्ये नागपूर येथे १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करून 'सेंट्रल इंडिया स्पिनिंग, विव्हिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी' सुरू केली. नागपूरची निवड करण्याचे कारण म्हणजे ते कापूस उत्पादक क्षेत्राजवळ होते, रेल्वे जंक्शनमुळे वाहतूक सोपी होती आणि पाणी तसेच इंधनाचा पुरवठा चांगला होता.
रेशीम उद्योगाला प्रोत्साहन १८७३ मध्ये जमशेदजींनी कापडाच्या निर्यातीसाठी स्वतःची शिपिंग कंपनी सुरू करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी लंडनहून 'अॅनी बॅरो' नावाचे जहाज भाड्याने घेतले, पण त्यांची 'टाटा लाईन' ही कंपनी फार काळ टिकली नाही. जमशेदजींनी रेशीम उद्योगालाही प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी जपानला भेट देऊन रेशीम किड्यांच्या संगोपनाची वैज्ञानिक पद्धत समजून घेतली आणि भारतात, म्हैसूरमध्ये हा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न केले.
जमशेदजी टाटा यांनी देशाला पहिली मोठी स्टील कंपनी (टाटा स्टील), पहिले आलिशान हॉटेल (ताज हॉटेल) आणि पहिली भारतीय ग्राहकोपयोगी वस्तू कंपनी दिली. इतकेच नव्हे, तर पहिली भारतीय विमान कंपनी टाटा एअरलाइन्स (जी नंतर एअर इंडिया बनली) याच समूहाने सुरू केली होती.
वाचा - अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
जमशेदजी टाटा यांच्या दूरदृष्टी आणि कार्यामुळे टाटा समूह आज जगभर ओळखला जातो. हुरुनच्या एका अहवालानुसार, ते गेल्या १०० वर्षांतील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती ठरले आहेत.