Join us

इटली मोठ्या आर्थिक संकटात! जॉर्जिया मेलोनींच्या देशावर तब्बल दोन लाख कोटींचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 16:49 IST

PM मेलोनी देशाच्या विशेष वारसा व सेवांचा लिलाव करणार असल्याची चर्चा

Italy Financial Crisis PM Giorgia Meloni: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या भारतीयांमध्येही चांगल्याच लोकप्रिय आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांचे राजकीय संबंध सलोख्याचे असल्याने भारतातही त्यांच्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असते. पण सध्या मेलोनी यांचा देश एका संकटात अडकला आहे. जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील देश इटली आज आर्थिक संकटाचा सामना करत आहे. इटलीवर २ अब्ज युरो म्हणजेच २ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. यावर मात करण्यासाठी पीएम मेलोनी आपल्या देशाच्या विशेष ठेवी विकणार आहेत, अशी चर्चा आहे.

पंतप्रधान मेलोनी यांनी पोस्टल सेवेचा काही भाग विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही तीच टपाल सेवा आहे, जी सेवा एकेकाळी इटलीच्या पंतप्रधानांच्या शिरपेचातील तुरा मानला जायचा. कारण इटलीचा हा वारसा प्रचंड मौल्यवान आहे.

१.७९ लाख कोटी रुपये उभारण्याची योजना

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मेलोनी 2026 पर्यंत देशातील टपाल सेवेचा लिलाव करून सुमारे 1.79 लाख कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत. इटलीची पोस्टल सर्व्हिस (पोस्ट इटालियन) रेल्वे कंपनी फेरोवी डेलो स्टॅटो आणि पॉवर कंपनी एनीमध्ये भागीदारी आहे. याशिवाय विमा आणि बँकिंगच्या कामातही त्यांचा सहभाग आहे. सरकारच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा यातूनच मिळतो. मात्र सध्या तोट्यात चाललेल्या सरकारला हा मोठा उपक्रम चालवणे कठीण जात आहे.

लिलावामुळे सरकारी कर्जावर परिणाम

या सेवेतील काही विभागाचा लिलाव केल्याने सरकारच्या कर्जावर फारसा परिणाम होणार नसल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. कारण सरकारवर खूप कर्ज आहे. एका अहवालानुसार, इटलीवर सुमारे 2.48 ट्रिलियन डॉलर्सचे एकूण कर्ज आहे आणि हे कर्ज इटलीच्या जीडीपीच्या सुमारे 135 टक्के आहे. आजकाल इटलीमध्ये सरकारच्या धोरणांवर बरीच टीका होत आहे. हळूहळू बुडत चाललेली आर्थिक स्थिती सुधारण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे.

टॅग्स :इटलीभारत