Semicon India 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीमध्ये 'सेमीकॉन इंडिया २०२५' परिषदेचे उद्घाटन केले. तीन दिवस चालणारे हे संमेलन भारतात एक मजबूत, सक्षम आणि शाश्वत सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करेल. या खास प्रसंगी, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान मोदी यांना भारताने तयार केलेली पहिली वहिली चिप भेट दिली.
या देशातील पहिल्या 'मेड इन इंडिया' चिपला 'विक्रम' असे नाव देण्यात आले आहे. 'विक्रम' ही एक ३२-बिट मायक्रोप्रोसेसर असून, ती भारताच्या अंतराळ संस्था इस्रोने विकसित केली आहे.
टोकाच्या परिस्थितीतही पूर्ण क्षमतेने काम करेल 'विक्रम'इस्रोच्या सेमीकंडक्टर लॅबमध्ये तयार झालेल्या 'विक्रम' चिपचे संपूर्ण उत्पादन भारतातच झाले आहे. ही चिप अंतराळ यानांच्या अत्यंत कठीण परिस्थितीत वापरण्यासाठी पूर्णपणे योग्य आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ही चिप कोणत्याही परिस्थितीत आपल्या पूर्ण क्षमतेने काम करण्यास सक्षम आहे. अश्विनी वैष्णव यांनी 'विक्रम' चिपसोबतच आणखी अनेक चिप्स सादर केल्या, ज्या वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे तयार केल्या जात आहेत. या इतर चिप्स, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या ४ मोठ्या प्रकल्पांचे चाचणी चिप आहेत.
वाचा - सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
छोट्याशा चिपमध्ये २१ व्या शतकाची शक्तीमंगळवारी 'सेमीकॉन इंडिया' परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की, जगाचा भारतावर विश्वास आहे. सेमीकंडक्टरचे भविष्य भारतासोबत घडवण्यासाठी जग तयार आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, भारत सेमीकंडक्टर क्षेत्रात सातत्याने प्रगती करत आहे. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ते म्हणाले, "२१ व्या शतकाची शक्ती एका छोट्याशा चिपमध्ये आहे."