Join us

रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:14 IST

Mehli Mistry Tata Trust: रतन टाटा यांचे जवळचे सहकारी मेहली मिस्त्री यांना सर दोराबजी टाटा ट्रस्ट (SDTT) आणि सर रतन टाटा ट्रस्टच्या (SRTT) च्या बोर्डातून बाहेर करण्यात आलं आहे. नोएल टाटा यांच्यासह टाटा ट्रस्ट्सच्या तीन विश्वस्तांनी मिस्त्री यांच्या पुन्हा नियुक्ती करण्याच्या विरोधात मतदान केलं

Mehli Mistry Tata Trust: रतन टाटा यांचे जवळचे सहकारी मेहली मिस्त्री यांना सर दोराबजी टाटा ट्रस्ट (SDTT) आणि सर रतन टाटा ट्रस्टच्या (SRTT) च्या बोर्डातून बाहेर करण्यात आलं आहे. नोएल टाटा यांच्यासह टाटा ट्रस्ट्सच्या तीन विश्वस्तांनी मिस्त्री यांच्या पुन्हा नियुक्ती करण्याच्या विरोधात मतदान केलं. रतन टाटा यांचे धाकटे बंधू, ८५ वर्षीय जिमी टाटा यांनी मतदान केलं नाही आणि त्यांचा हाच निर्णय निर्णायक ठरला. एम पलोनजी ग्रुपचे प्रमुख असलेले मेहली मिस्त्री हे टाटा समूहात पडद्याआड काम करणारे एक मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. विश्वस्त म्हणून, ते अॅडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्स संबंधित मुद्द्यांवर त्यांच्या अचूक मतांसाठी प्रसिद्ध होते.

मिस्त्री हे २०२२ पासून सर दोराबजी टाटा ट्रस्ट (SDTT) आणि सर रतन टाटा ट्रस्टचे (SRTT) विश्वस्त होते. हे दोन्ही मुख्य ट्रस्ट्स मिळून टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये बहुतांश हिस्सेदारी ठेवतात. त्यांना टाटा सन्सच्या बोर्डातील एक-तृतीयांश सदस्यांना नॉमिनेट करण्याचा अधिकार आहे.

'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?

नोएल यांना अध्यक्ष बनवण्यात महत्त्वाची भूमिका

विशेष म्हणजे, मेहली मिस्त्री, जे सायरस मिस्त्री यांचे चुलत भाऊ आहेत, त्यांनीच २०२४ मध्ये रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांना ट्रस्ट्सचे अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. ते रतन टाटा यांच्या मृत्युपत्राचे कार्यापालक (Executor of Will) देखील आहेत. मेहली हे एम पलोनजी ग्रुपचे अध्यक्ष आहेत, जो बांधकाम, पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी क्षेत्रात काम करतो. मेहली मिस्त्री २००० च्या दशकापासून टाटा समूहाच्या प्रशासकीय कारभारात सक्रिय भूमिका बजावत आहेत. शापूरजी पलोनजी ग्रुपचा टाटा सन्समध्ये १८ टक्के हिस्सा आहे.

मेहली मिस्त्री यांना रतन टाटांच्या अलिबाग येथील मालमत्ता आणि खासगी संग्रहातील काही वस्तू देखील वारसा हक्कानं मिळाल्यात. जेव्हा सायरस मिस्त्री यांना टाटा सन्स मधून काढण्यात आलं होतं, तेव्हा मेहली मिस्त्री यांनी रतन टाटांच्या पाठीशी उभे राहून त्यांना कठीण काळात स्थिरता दिली होती.

या मतभेदाचा संपूर्ण समूहावर परिणाम होईल?

टाटा ट्रस्ट्सकडे टाटा सन्सचा जवळपास ६६% हिस्सा आहे. त्यामुळे तेथे वाढत असलेले अंतर्गत मतभेद संपूर्ण टाटा ग्रुपच्या भविष्यावर परिणाम करू शकतात. सुरुवातीला हा मुद्दा केवळ प्रशासकीय प्रक्रिया आणि गव्हर्नन्सबद्दल होता, पण आता हा वाद 'ट्रस्ट्स टाटा सन्सवर किती नियंत्रण ठेवतील' आणि 'धोरणात्मक निर्णयांमध्ये विश्वस्तांची भूमिका किती असावी' या टप्प्यावर पोहोचला आहे.

जवळपास ३०० अब्ज डॉलरचं असलेले टाटा ग्रुपसारखे मोठे व्यावसायिक साम्राज्य आता अंतर्गत तणाव आणि विश्वासाच्या संकटाशी झुंजताना दिसत आहे. आगामी काळात मेहली मिस्त्री या निर्णयाविरुद्ध काय पाऊल उचलतात आणि हा वाद टाटा ट्रस्ट्सच्या भविष्याची दिशा निश्चित करतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratan Tata's close aide Mehli Mistry ousted from Tata Trusts.

Web Summary : Mehli Mistry, a close associate of Ratan Tata, was removed from Tata Trusts' board due to governance disagreements. His ouster raises concerns about internal conflicts impacting the $300 billion Tata Group's future direction and control over Tata Sons.
टॅग्स :नोएल टाटारतन टाटा