चीनला जे हवं होतं, ते होताना दिसतंय. चीनच्या या कारवाईत भारत जवळपास अडकलाय. चीननं रेअर अर्थ मॅग्नेट्सच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. याचा परिणाम आता भारतातील ईव्ही कंपन्यांवर दिसू लागलाय. बजाज ऑटो, एथर एनर्जी आणि टीव्हीएस मोटर कंपनी सारख्या कंपन्यांना चीनमधून येणाऱ्या या विशेष चुंबकांच्या तुटवड्यामुळे उत्पादन कमी करावं लागू शकतं.
हे चुंबक हेवी रेअर अर्थपासून (एचआरई) बनवलेले असतात. त्यांचा पुरवठा चीनमधून केला जातो, मात्र गेल्या चार महिन्यांपासून ही समस्या आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ मंदावण्याची शक्यता आहे. चीननं या चुंबकांच्या निर्यातीसंदर्भात काही नियम केलेत.
कंपन्यांवर किती परिणाम?
बजाज ऑटो ही इलेक्ट्रिक दुचाकींची दुसरी सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी आपलं अर्ध उत्पादन कमी करू शकते. बंगळुरूची एथर एनर्जीही आपल्या उत्पादनात ८ ते १० टक्क्यांनी कपात करण्याची योजना आखत आहे. टीव्हीएस मोटर कंपनीची विक्री गेल्या तीन महिन्यांपासून सर्वाधिक आहे. पण आता त्यांनाही उत्पादन कमी करावं लागू शकतं.
इंजिनसाठी आवश्यक चुंबक
या तिन्ही कंपन्यांना एचआरई चुंबकांचा तुटवडा भासत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या इंजिनसाठी हे चुंबक अत्यंत महत्त्वाचे आहेत. ईव्ही पुरवठा साखळीत समस्या आहेत. चुंबकांची उपलब्धता ही मोठी समस्या आहे. ही आव्हानं पेलण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं टीव्हीएस मोटरच्या प्रवक्त्यानं सांगितलं.
यापूर्वी ओला इलेक्ट्रिक कंपनी आघाडीवर होती. पण त्यांच्या उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही, असं त्यांचं म्हणणे आहे. कारण त्यांनी आधीच भरपूर चुंबकांचा साठा करून ठेवला आहे. ओला इलेक्ट्रिकच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, रेअर अर्थ मॅग्नेट्समुळे उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही. ओलाकडे पाच ते सहा महिन्यांपर्यंत या चुंबकांचा साठा आहे. कंपनी पुरवठा साखळीच्या इतर पर्यायांवरही काम करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी जुलैमध्ये उत्पादनात किंचित वाढही करू शकते.
ओलावर कमी परिणाम होण्याचे एक कारण म्हणजे कंपनीची कामगिरी थोडी कमकुवत राहिली आहे. जूनमध्ये ओला इलेक्ट्रिक सलग दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या स्थानावर घसरली होती. या चार कंपन्यांचा (बजाज, एथर, टीव्हीएस आणि ओला) मोठा बाजार हिस्सा आहे. दर दहापैकी आठ इलेक्ट्रिक दुचाकी या कंपन्यांच्या आहेत.