तेहरान : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा निर्बंध लादण्यासाठीच्या आदेशावर स्वाक्षरी करताच इराणचे चलन रियाल गडगडले. एक डॉलरची किंमत तब्बल साडेआठ लाख रियाल झाली. त्यामुळे इराणचा आंतरराष्ट्रीय व्यापार ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरी केली. या आदेशान्वये त्यांनी इराणच्या तेल निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. इराणविरुद्ध संयुक्त राष्ट्रांनीही निर्बंध लादावेत, असे आवाहन ट्रम्प यांनी केले आहे.
त्यामुळे इराणी रियालचा कडेलोट झाला. १ डॉलरची किंमत ८,५०,००० रियाल झाली. दशकभरापूर्वी ती ३२,००० रियाल इतकी होती.
भारतीय रुपया आणखी तळात
मुंबई : जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने बुधवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ३९ पैशांनी घसरून ८७.४६ या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला.
बाजारातील गुंतवणूकदार अमेरिका आणि चीनने एकमेकांवर लादलेल्या टॅरिफच्या परिणामाबद्दल चिंतित आहेत. त्याचा परिणाम जागतिक चलन मूल्यावर होत आहे.