Iran Currency Rial : काय होतास तू, काय झालास तू... हे मराठीतील प्रसिद्ध गाणं तुम्हालाही माहिती असेल. सध्या अशीच अवस्था इराण या देशाची झाली आहे. तेलाचे नैसर्गिक भांडार असलेले इराणमध्ये एकेकाळी सोन्याच्या घागरीने पाणी भरावं इतकी अफाट संपत्ती होती. मात्र, गृहयुद्धी आणि दहशतवाद या कारणांमुळे सध्या देशाची अवस्था बिकट झाली आहे. आता तर देशाचे चलन रियालचे मूल्य मातीमोल झाले आहे. इराणचे चलन रियाल विक्रमी नीचांकी पातळीवर घसरले आहे. आता १०,४३,००० इराणी रियाल एका अमेरिकन डॉलरच्या बरोबरीचे झाले आहे.
इराणची अशी अवस्था का झाली?इराणच्या या अवस्थेला अनेक कारणे कारणीभूत आहेत. यातील मुख्य म्हणजे दहशतवादाला खतपाणी घालणे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी या देशावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. एपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, तेहरानमधील चलन विनिमयाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या फेरदौसी स्ट्रीटवरील व्यापाऱ्यांनी अनिश्चिततेच्या दबावाखाली चलन विनिमय दराचा डिस्प्ले बोर्ड बंद केला. आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था अनेक वर्षांपासून दबावाखाली आहे. विशेषत: २०१८ मध्ये तेहरानसोबतच्या अणुकरारातून अमेरिकेने माघार घेतल्यानंतर या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणखी परिणाम झाला आहे.
ट्रम्प यांनी साधला इराणवर निशाणा २०१५ च्या कराराच्या वेळी, इराणने आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवण्याच्या बदल्यात तेहरानचा युरेनियमचा साठा ३०० किलोग्रॅम (६६१ पाउंड) आणि संवर्धन ३.६७ टक्क्यांपर्यंत मर्यादित केला. त्या काळात रियाल प्रति डॉलर ३२,००० वर व्यापार करत होता. जानेवारीमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा इराणवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली.
या अंतर्गत, त्यांनी इराणी कच्चे तेल आणि पेट्रोकेमिकल उद्योगातील १६ संस्थांवर बंदी घातली. यामध्ये चीनमध्ये सवलतीत विक्री करणाऱ्या कंपन्यांचाही समावेश होता. त्यामुळे रियालचे मूल्य आणखी घसरले. तेल विक्रीतील घट आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे महागाईच्या दबावामुळे इराणी चलनात घसरण झाल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.