Join us

सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 06:35 IST

Gold Rate Prediction: पुढील वर्षभरात किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता; सोन्याची किंमत १,१३,००० रुपयांवर; दरात आणखी वाढ होणार

नवी दिल्ली : जागतिक अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, त्यांच्या किमती नव्या उच्चाकांवर पोहोचल्या आहेत. गेल्या एका वर्षात सोन्याच्या किमतीत तब्बल ४४ टक्के तर चांदीच्या किमतीत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  (Gold Price Predictions for 2025)

६ महिन्यांत सोने आणि चांदीच्या दरात अनुक्रमे २६ टक्के आणि २९ टक्के इतकी प्रचंड वाढ झाली आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किमतीत अधिक वाढ होत असल्याचे आकडेवारीतून समोर येते.

मंगळवारी सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅममागे पाच हजारांची तर चांदीच्या किमतीत २,८०० रुपयांची मोठी वाढ झाली होती. बुधवारीही सोन्याच्या किमतीत किमतीत प्रति १० ग्रॅममागे २५० रुपयांनी वाढ होत ते १,१३,००० रुपयांवर पोहोचले आहे. सोन्याच्या किमतीत एका आठवड्यात ७ टक्क्यांची तर चांदीच्या किमतीत ८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

किमती का वाढताहेत?

डॉलरची किंमत होत आहे, सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी, अमेरिकेत नोकरीच्या संधी कमी झाल्याने व्याजदरात कपातीची शक्यता, जागतिक तणाव आणि व्यापार युद्ध.

ईटीएफमधूनही ४४ टक्के परतावा 

ईटीएफनी (एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स) यावर्ष गुंतवणूकदारांना ४४ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. सोन्यावर आधारित ईटीएफनी सरासरी ४०.१० टक्के परतावा दिला आहे. यूटीआय गोल्ड ईटीएफने सर्वोच्च ४१.०७ टक्के परतावा दिला.

चांदीला मागणी का?

गुंतवणूक व औद्योगिक मागणी वाढली. प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सवलत, सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि ५ जी पायाभूत सुविधा या क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे चांदीच्या किमतीत वाढ होत आहे.

चांदीच्या किमती लवकरच जाणार दीड लाखांवर?

औद्योगिक क्षेत्रातून होत असलेली मोठी मागणी, कमकुवत झालेला डॉलर, ट्रम्प टॅरिफमुळे निर्माण झालेली जागतिक अनिश्चितता यामुळे सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

२ येत्या सहा महिन्यांत चांदीच्या किमती १ लाख ३५ हजारांवर तर १२ महिन्यांत भारतात चांदीचा दर प्रति किलो दीड लाखांवर जाण्याची शक्यता मोतीलाल ओसवालच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स :सोनंगुंतवणूकचांदीटॅरिफ युद्ध