Join us

गुंतवणूकदारांचा कल वाढला, सोने ५० हजार तर चांदी ५१ हजार ५०० भाव वधारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 07:01 IST

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात सुवर्णबाजार सुरू झाला तरी चांदीची आवक कमी असल्याने तिचे भाव वाढतच होते. त्यात सोन्याच्याही भावात झपाट्याने वाढ होत गेली.

जळगाव : अमेरिकेसह विदेशातील विविध बँकांनी व्याजदर शून्य केल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढू लागल्याने त्यांच्या भावात मोठी वाढ होत आहे. बुधवारी एकाच दिवसात चांदीच्या भावात थेट १२०० रुपयांनी वाढ होऊन ती ५१ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. सोन्याच्याही भावात एकाच दिवसात ७०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे.

कोरोनामुळे आवक कमी व भारत-चीनमधील तणावामुळे गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सातत्याने वाढ सुरूच आहे. त्यात अमेरिकासह विदेशातील विविध बँकांनी व्याजदर शून्य केल्याने गुंतवणूकदारांचा कल सोने-चांदीकडे वाढला आहे. २७ जून रोजी सोने-चांदीचे भाव एकसारखे होऊन ते ४९ हजार ३०० रुपयांवर आले होते. त्यानंतर मंगळवारी चांदीच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ती ५० हजार ३०० रुपयांवर येत ५० हजारांचा पल्ला ओलांडला होता. सोन्याचे भाव मात्र ४९ हजार ३०० रुपयांवर स्थिर होते. बुधवार, १ जुलै रोजी तर चांदीच्या भावात थेट १२०० रुपयांनी वाढ होऊन ती ५१ हजार ५०० रुपयांवर पोहोचली.

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात सुवर्णबाजार सुरू झाला तरी चांदीची आवक कमी असल्याने तिचे भाव वाढतच होते. त्यात सोन्याच्याही भावात झपाट्याने वाढ होत गेली. मागणी कायम असल्याने २७ रोजी सोन्यात ४०० रुपयांनी वाढ होऊन ते ४९ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. दुसरीकडे चांदीत ६०० रुपयांची घसरण होऊन तीदेखील ४९ हजार ३०० रुपये प्रतिकिलोवर आली होती.अमेरिकेसह विदेशात विविध बँकांनी व्याजदर शून्य केल्याने सोने-चांदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढत आहे. सुवर्णनगरी जळगावात प्रथमच सोन्याचे भाव ५० हजार रुपये प्रतितोळा झाले आहे. - सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक

टॅग्स :सोनंचांदी