शेअर बाजारात प्रचंड चढउताराचे वातावरण असतानाच नोव्हेंबर महिन्यात (2024) म्युच्युअल फंड्स इंफ्लोजमध्येही (Mutual Fund Inflows) 75 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात म्युच्युअल फंडांच्या सर्व योजनांमध्ये एकूण 60,363 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. हा आकडा ऑक्टोबर 2024 मध्ये 2.39 लाख कोटी रुपये एवढा होता.
याशिवाय, इक्विटी म्युच्युअल फंड्स (Equity Mutual Funds) इंफ्लोमध्ये 14 टक्क्यांची घसरण झाली आहे. इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये नोव्हेंबर महिन्यात 35,943 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. हा आकडा ऑक्टोबर 2024 मध्ये 41,886 कोटी रुपये एवढा होता.
नोव्हेंबर महिन्यात SIP ची गुंतवणूक फ्लॅट - असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया अर्थात AMFI च्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे होणारी गुंतवणूक फ्लॅट राहिली. म्हणजेच, नोव्हेंबर महिन्यात म्युच्युअल फंडांच्या SIP योजनांद्वारे 25,320 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, तर ऑक्टोबर 2024 मध्ये, 25,323 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. नोव्हेंबरमहिन्यात एकूण 49.46 लाख नव्या SIP ची नोंदणी झाली आहे. हा आकडा ऑक्टोबर महिन्यात 63.70 लाख होता. तथापि, एकूण SIP खात्यांची संख्या 10.23 कोटी या सर्वोच्च पातळीवर पोहचली आहे. हा आकडा ऑक्टोबर महिन्यात 10.12 कोटी एवढा होता.
मंथली SIP 25000 कोटी रुपयांच्या वर - डेटासंदर्भात भाष्य करताना Amfi CEO व्यंकट चालसानी म्हणाले, मासिक SIP इंफ्लो 25000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. कमी कालावधीत बाजारात चढ-उतार असतानाही, हे गुंतवणूकदारांच्या दीर्घ काळासाठी गुंतवणुकीचे व्हिजन आणि आर्थिक लक्ष्य प्राप्त करण्यची कमिटमेंट दर्शवते.