Urban Company Stock: एकेकाळची छोटीशी गुंतवणूक आज अब्जावधींमध्ये बदलली आहे. सिलिकॉन व्हॅलीची प्रसिद्ध व्हेंचर कॅपिटल कंपनी एसेलनं पुन्हा एकदा जबरदस्त नफा कमावलाय. ही तीच कंपनी आहे जिनं फेसबुकमध्ये सुरुवातीची गुंतवणूक करून इतिहास रचला होता. यावेळी एसेलनं होम सर्व्हिस स्टार्टअप अर्बन कंपनीमध्ये गुंतवलेली गुंतवणूक काढून मोठा नफा कमावलाय. जेव्हा कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात आला तेव्हा त्याचे शेअर्स ५७% पेक्षा जास्त प्रीमियमवर उघडले गेले.
सुमारे १० वर्षांपूर्वी, एक्सेलनं अर्बन कंपनीचे शेअर्स सरासरी ३.७७ रुपये प्रति शेअर दरानं खरेदी केले. त्यावेळी एकूण गुंतवणूक सुमारे १४.३ कोटी रुपये होती. आता याचंच मूल्य आयपीओ प्राइस बँडनुसार सुमारे ३९० कोटी रुपये झालंय. म्हणजेच, एसेलला सुमारे २७ पट परतावा मिळाला आहे. विशेष म्हणजे ही केवळ आंशिक विक्री आहे. अर्बन कंपनीमध्ये एसेलची एकूण गुंतवणूक ५५ कोटी रुपये होती, ज्यामुळे १४.५६ कोटी शेअर्स मिळाले. आयपीओनंतरही एसेलकडे १,१०० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे शेअर्स शिल्लक आहेत.
फेसबुकमधून ८०० पट परतावा
एसेलच्या मोठ्या कमाईनं त्याच्या उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्डमध्ये आणखी एक नाव जोडले. ही तीच कंपनी आहे जिनं फेसबुकमध्ये गुंतवणूक करून ८०० पट परतावा मिळवलाय. भारतातही एसेलनं Acko आणि Cult.fit सारख्या अनेक यशस्वी स्टार्टअप्समध्ये सुरुवातीची गुंतवणूक केली आहे. अर्बन कंपनीमध्ये गुंतवणूक करणं हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे 'एसेल'चे पार्टनर अभिनव चतुर्वेदी यांनी सांगितले. त्यांच्या मते, हे केवळ आर्थिक यश नाही, तर सामाजिक परिवर्तनाचं एक उदाहरणही आहे.
अर्बन कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या इश्यूला १०३ पेक्षा अधिक पट सबस्क्राइब करण्यात आलं. बहुतेक बोली मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून आणि हाय नेटवर्थ असलेल्या व्यक्तींकडून आल्या. आयपीओमध्ये ₹४७२ कोटींचा नवीन इश्यू आणि ₹१,४२८ कोटींचा विक्रीचा प्रस्ताव होता, ज्यामध्ये अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी त्यांची भागीदारी कमी केली.