Join us

भारतात गुंतवणूक करा; मोदी यांचे ‘ब्रिक्स’मध्ये आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 04:07 IST

भारतात सर्वाधिक खुली व गुंतवणूकस्नेही अर्थव्यवस्था आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ब्रिक्स बिझनेस फोरम’च्या व्यासपीठावरून केले.

ब्रासिला : भारतात सर्वाधिक खुली व गुंतवणूकस्नेही अर्थव्यवस्था आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ब्रिक्स बिझनेस फोरम’च्या व्यासपीठावरून केले. भारतातील अमर्याद शक्यता आणि अगणित संधी यांचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूक करण्याचे आवाहनही मोदी त्यांनी केले.मोदी म्हणाले की, जगात मंदी असतानाही ५ देशांचा समावेश असलेला ब्रिक्स समूह आर्थिक विकासाचे नेतृत्व करीत आहे. भारतात राजकीय स्थैर्य आहे. आमची धोरणे स्थिर आहेत, भारताने व्यवसायस्नेही सुधारणा केल्या आहेत. २०२४ पर्यंत आम्ही भारताला ५ लाख कोटी (ट्रिलियन) डॉलरची अर्थव्यवस्था बनविणार आहोत. भारतातील केवळ पायाभूत सोयींच्या विकासासाठीच आम्हाला १.५ लाख कोटी डॉलर गुंतवणुकीची गरज आहे.भारतात अमर्याद शक्यता आणि अगणित संधी आहेत. त्याचा ब्रिक्स देशांतील व्यावसायिकांनी लाभ घ्यावा. भारतात या आणि आपला व्यवसाय वाढवा, असे निमंत्रण मी ब्रिक्स देशातील व्यावसायिकांना देत आहे, असेही सांगून ते म्हणाले की, जगात मंदी असतानाही ब्रिक्स देशांनी आर्थिक वृद्धीला गती दिलेली आहे. लक्षावधी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढले आहे. तंत्रज्ञान आणि नावीन्य यामध्ये मुसंडी मारली आहे. स्थापनेच्या १० वर्षांनंतर ब्रिक्स हा एक चांगला मंच बनला आहे. भविष्यातील आपल्या प्रयत्नांना तो दिशा देऊ शकतो. ब्रिक्स देशांमधील परस्पर व्यवसाय अधिकाधिक सुलभ होण्याची गरज आहे. त्यातून परस्परांतील व्यापार आणि गुंतवणूक यात वाढ होईल, अशी अपेक्षाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :नरेंद्र मोदी