Join us
Daily Top 2Weekly Top 5

इन्फोसिसच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची उसळी! नफ्यात घट होऊनही गुंतवणूकदारांची तुफान खरेदी; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:46 IST

Infosys Share Price : इन्फोसिसच्या शेअर्सच्या किमती आज वाढत्या प्रमाणात व्यवहार करत आहेत. कंपनीच्या महसूल मार्गदर्शनात वाढ आणि ब्रोकरेजकडून सकारात्मक दृष्टिकोनामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात इन्फोसिसचे शेअर्स खरेदी करत आहेत.

Infosys Stock : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या शेअर्समध्ये आज शुक्रवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी या शेअरवर पसंतीची मोहोर उमटवली असून, सकाळच्या सत्रात शेअरचा भाव ५ टक्क्यांनी वधारून १,६८२ रुपयांवर पोहोचला. कंपनीने भविष्यातील उत्पन्नाबाबत दिलेला सकारात्मक अंदाज आणि ४.८ अब्ज डॉलर्सच्या मोठ्या करारांमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

एडीआरमधील तेजीचा सकारात्मक परिणामइन्फोसिसचा शेअर मागील सत्रात १,६०८.९ रुपयांवर बंद झाला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर अमेरिकन बाजारपेठेत सूचीबद्ध असलेल्या इन्फोसिसच्या ADR मध्ये ८ टक्क्यांची मोठी वाढ झाली होती, ज्याचे थेट प्रतिबिंब आज भारतीय शेअर बाजारात उमटले. सुरुवातीला गुंतवणूकदार निकालाबाबत साशंक होते, पण कंपनीच्या भक्कम 'रोडमॅप'मुळे खरेदीचा ओघ वाढला.

नफा घटला तरी गुंतवणूकदार खूश का?डिसेंबर तिमाहीत इन्फोसिसच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक २.२ टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही घट तांत्रिक स्वरूपाची आहे. केंद्र सरकारच्या नव्या 'लेबर कोड'मुळे कंपनीला मोठा अतिरिक्त खर्च करावा लागला, ज्याचा परिणाम नफ्यावर झाला. हा एकवेळचा खर्च वगळता कंपनीची परिचालन कार्यक्षमता आणि मार्जिन स्थिर असल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले आहे.

४.८ अब्ज डॉलर्सच्या 'मेगा डील्स' आणि गाईडन्सइन्फोसिसने चालू आर्थिक वर्षासाठी आपल्या महसुली वाढीचा अंदाज ३ ते ३.५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. या तिमाहीत कंपनीने तब्बल ४.८ अब्ज डॉलर्सचे नवे करार केले आहेत, ज्यात दोन 'मेगा डील्स'चा समावेश आहे. या मोठ्या करारांमुळे मध्यम कालावधीत कंपनीच्या उत्पन्नाची शाश्वती निर्माण झाली आहे, असे ब्रोकरेज फर्म्सचे म्हणणे आहे.

काय म्हणतात ब्रोकरेज फर्म्स?दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसनी इन्फोसिसच्या शेअरवर आपली 'बाय' रेटिंग कायम ठेवली आहे.

ब्रोकरेज फर्म रेटिंग सुधारित टार्गेट प्राईस
HSBC खरेदी१,८७० रुपये 
CLSA Outperform१,७७९ रुपये

सीएलएसएच्या मते, गेल्या वर्षभरात इन्फोसिसने निफ्टी-५० च्या तुलनेत सुस्त कामगिरी केली होती, त्यामुळे आता या शेअरमध्ये मोठी 'री-रेटिंग' होऊन भाव वाढण्याची दाट शक्यता आहे.

वाचा - ट्रक ड्रायव्हर बनला 'सोशल मीडिया स्टार'! ड्रायव्हरने युट्यूबच्या पैशातून खरेदी केला ४० लाखांचा ट्रक

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Infosys Shares Surge Despite Profit Dip; Investors Buy Heavily

Web Summary : Infosys shares jumped 5% after positive future guidance and a $4.8 billion deal announcement. Despite a slight profit dip due to one-time expenses, investors were encouraged by the company's operational efficiency and strong roadmap, prompting brokerage firms to maintain buy ratings.
टॅग्स :इन्फोसिसस्टॉक मार्केटशेअर बाजारगुंतवणूक