Join us

Narayana Murthy : नारायण मूर्तींनी ५० कोटींना खरेदी केलं अपार्टमेंट, माल्ल्याशी आहे लोकेशनचं कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 14:59 IST

आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी बंगळुरूच्या किंगफिशर टॉवर्समध्ये एक लक्झरी अपार्टमेंट खरेदी केलं. जाणून घ्या याबद्दल माहिती

आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसचे (Infosys) संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी बंगळुरूच्या किंगफिशर टॉवर्समध्ये ५० कोटी रुपयांना एक लक्झरी अपार्टमेंट खरेदी केलंय. सोळाव्या मजल्यावर असलेला हा फ्लॅट ८,४०० स्क्वेअर फुटांमध्ये पसरला आहे. यात चार बेडरूम आणि पाच कार पार्किंगचा समावेश आहे. 

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, हा करार ५९,५०० रुपये प्रति चौरस फूट दरानं करण्यात आला आहे. चार वर्षांपूर्वी नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्ती यांनी याच टॉवरच्या २३ व्या मजल्यावर फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटसाठी २९ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

किंगफिशर टॉवरबाबत माहिती

किंगफिशर टॉवर्स हे ३४ मजली लक्झरी निवासी संकुल असून त्यात सुमारे ८१ अपार्टमेंट्स आहेत. हे ४ बीएचके अपार्टमेंट ८००० चौरस फुटांपासून सुरू होतात आणि ४.५ एकर जागेवर तीन ब्लॉकमध्ये पसरलेला आहे. एकेकाळी विजय माल्ल्याचे वडिलोपार्जित घर ज्या जागेवर होते, त्या जागेवर हा टॉवर उभारण्यात आला आहे. २०१० मध्ये प्रेस्टीज ग्रुप आणि माल्ल्याच्या कंपनीच्या संयुक्त उपक्रमात हा प्रकल्प उभारण्यात आला होता. हे लक्झरी अपार्टमेंट सुरुवातीला २२ हजार रुपये प्रति चौरस फूट दराने विकले जात होते.

बड्या सेलिंब्रिटींचीही घरं

किंगफिशर टॉवर्समध्ये अनेक बड्या व्यक्तींचीही घरं असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय. यामध्ये बायोकॉनच्या किरण मजूमदार शॉ आणि कर्नाटकचे मंत्री केजे जॉर्ज यांचा मुलगा राणा जॉर्ज यांचाही समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी कर्नाटकचे ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांचा मुलगा राणा जॉर्ज यांनी ३५ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला होता.

२०१७ मध्ये एम्बेसी ग्रुपनं इंजिनीअरिंग आउटसोर्सिंग फर्म क्वेस्ट ग्लोबलचे चेअरमन अजित प्रभू यांना ५० कोटी रुपयांना एक फ्लॅट विकला होता. प्रभू यांनी हेब्बाळजवळील एम्बेसी वनमध्ये सुमारे ३१ हजार रुपये प्रति चौरस फूट दराने १६ हजार चौरस फुटांचा फ्लॅट खरेदी केला. रिपोर्टनुसार, किंगफिशर टॉवर्सचा प्रत्येक रहिवासी तिमाही देखभालीसाठी पाच लाख रुपये देतो.

टॅग्स :इन्फोसिसनारायण मूर्ती