Join us

IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 15:50 IST

IndiGo system slowdown : फक्त विमानांचे उड्डाणच झाले नाही तर ग्राउंड सेवाही ठप्प झाली. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्सची (IndiGo Airlines) यंत्रणा शनिवारी (दि.५) अचानक ठप्प झाली आहे. त्यामुळे देशभरातील विविध विमानतळांवर प्रवासी अडकून पडले आहेत. आता अडकलेल्या प्रवाशांनी केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (DGCA) मदतीचे आवाहन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १२.३० वाजता ही समस्या सुरू झाली. त्यामुळे केवळ विमानांचे उड्डाणच झाले नाही तर ग्राउंड सेवाही ठप्प झाली. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, या त्रासाबद्दल इंडिगो एअरलाइन्सने प्रवाशांची माफी मागितली आहे.

अनेक प्रवाशांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या समस्यांबद्दल लिहिले आहे. या तांत्रिक समस्येमुळे प्रवाशांना ना फ्लाइटमध्ये चढता येत आहे. ना तिकीट काढता येत आहे. प्रवाशांना आपल्या प्रवासाला होणाऱ्या विलंबामुळे विमानतळावर प्रवाशांची घोर निराशा झाली आहे. तसेच, इंडिगोने लिहिले आहे की, आमच्या नेटवर्कवर एक छोटीशी समस्या आली आहे. त्यामुळे इंडिगोची वेबसाइट आणि बुकिंग यंत्रणा काम करत नाही आहे. त्यामुळे ग्राहकाला चेक इन करण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागू शकतो. आमची टीम त्याचे निराकरण करत आहे. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही शक्य तितक्या लवकर परिस्थिती सुधारू.,असे इंडिगो एअरलाइन्सने म्हटले आहे.

दरम्यान, देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोकडून दररोज जवळपास अनेक विमानांचे उड्डाण केले जाते. यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचा समावेश आहे. त्यामुळे आजच्या तांत्रिक समस्येमुळे हे संकट मोठे झाले आहे. एका युजरने सोशल मीडियावर लिहिले की, इंडिगो नवीन विमाने खरेदी करत आहे. पण ग्राउंड सर्व्हिस वाढवण्यासाठी काहीही करू इच्छित नाही. आम्ही तासनतास अडकून आहोत आणि काहीही होत नाही. वृद्ध लोकही चिंतेत आहेत. डीजीसीएने यावर तातडीने कारवाई करावी. तर एका युजर्सने विमानतळाचा उल्लेख रेल्वे स्थानक असल्याचे म्हणत विमानतळावील फोटो शेअर केला आहे.

टॅग्स :इंडिगोविमानविमानतळव्यवसाय