Join us
Daily Top 2Weekly Top 5

IndiGo ची मोठी घोषणा! ब्रिटिश एअरवेजचे माजी प्रमुख विल्यम वॉल्श यांची CEO पदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:16 IST

Indigo Airline: विलियम वॉल्श हे एव्हिएशन उद्योगातील अनुभवी आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

Indigo Airline: देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने मंगळवारी मोठी घोषणा करत एव्हिएशन क्षेत्रातील अनुभवी विलियम वॉल्श यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या विलियम वॉल्श हे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) चे डायरेक्टर जनरल असून, त्यांचा IATA मधील कार्यकाळ ३१ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळेच ते ३ ऑगस्टपर्यंत किंवा त्याआधी इंडिगोच्या CEO पदाचा कार्यभार स्वीकारतील, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

एव्हिएशन क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व

विलियम वॉल्श यांच्या नावाची घोषणा इंडिगोचे विद्यमान CEO पीटर एल्बर्स यांनी अचानक पद सोडल्यानंतर तीन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधीत करण्यात आली आहे. दरम्यान,  विलियम वॉल्श हे एव्हिएशन उद्योगातील अनुभवी आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ते यापूर्वी ब्रिटिश एअरवेजचे CEO आणि IAG (इंटरनॅशनल एअरलाईन्स ग्रुप) चे CEO राहिले आहेत.

IAG ही होल्डिंग कंपनी असून तिच्या अंतर्गत Aer Lingus, British Airways, Iberia आणि Level Vueling या एअरलाईन्स येतात. एव्हिएशन क्षेत्रातील त्यांचा दीर्घ अनुभव आणि जागतिक दृष्टीकोन लक्षात घेऊन त्यांची इंडिगोच्या CEO पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

कंपनीच्या विस्ताराच्या टप्प्यात नियुक्ती

इंडिगोचे मॅनेजिंग डायरेक्टर राहुल भाटिया यांनी सांगितले की, कंपनी आता विस्तार आणि बदलाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे आणि अशा वेळी विलियम वॉल्श यांचे नेतृत्व कंपनीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. वॉल्श यांना जागतिक एव्हिएशन उद्योगाचा मोठा अनुभव आहे, ग्राहककेंद्रित एअरलाईन उभारण्याचा अनुभव आहे आणि ऑपरेशनल व्यवस्थापनात त्यांचे कौशल्य आहे. म्हणूनच कंपनीच्या विकासाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर ते योग्य नेतृत्व देऊ शकतात.

इंडिगोसाठी महत्त्वाचा काळ

ही नियुक्ती अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा इंडिगोला अलीकडे उड्डाणांमध्ये अडथळे आणि ऑपरेशनल समस्यांचा सामना करावा लागला आहे. कंपनी विस्तार, आंतरराष्ट्रीय मार्ग वाढ आणि फ्लीट वाढवण्याच्या तयारीत आहे. एव्हिएशन तज्ञांच्या मते, जागतिक अनुभव असलेला CEO आल्यामुळे आंतरराष्ट्रीय विस्तार वेगाने होऊ शकतो, ऑपरेशनल व्यवस्थापन सुधारू शकते, ग्राहक सेवा सुधारण्यावर भर दिला जाऊ शकतो आणि जागतिक स्पर्धेत इंडिगो अधिक मजबूत होऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : IndiGo Appoints William Walsh, Ex-British Airways Chief, as CEO

Web Summary : IndiGo names William Walsh, former British Airways CEO, as its new CEO. Walsh, currently at IATA, brings extensive aviation experience to lead IndiGo's expansion. This appointment occurs during a phase of growth and operational challenges for the airline.
टॅग्स :इंडिगोविमान