Donald Trump Tariff Effect: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादल्यापासून अमेरिका देखील भारतीयांचं लक्ष्य बनलं आहे. आता असं मानलं जातंय की भारतीय अमेरिकेतील अनेक मोठ्या ब्रँडवर बहिष्कार टाकू शकतात. यामध्ये मॅकडोनाल्ड, कोका-कोला, अमेझॉन, अॅपल इत्यादींचा समावेश आहे. जर असं झालं तर या अमेरिकन ब्रँड्सना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी भारतावर कर लादल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक आणि अनेक मोठे उद्योगपतींनी संताप व्यक्त केलाय. ते आता अमेरिकन वस्तूंवर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलत आहेत. भारत हा अमेरिकन कंपन्यांसाठी एक मोठा बाजार असल्यानं त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.
भारतात सर्वाधिक वापर
भारतात अनेक अमेरिकन ब्रँड आणि प्लॅटफॉर्मचा वापर जास्त केला जातो. मेटा कंपनीचं व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशन भारतात सर्वाधिक वापरलं जातं. भारतात डोमिनोजचे सर्वाधिक आउटलेट आहेत. पेप्सी आणि कोका-कोला सारख्या अमेरिकन कोल्ड्रिंक ब्रँडची दुकानं भारतात सर्वत्र दिसतात. अॅपल स्टोअर्स आणि स्टारबक्स आउटलेटमध्येही लोकांची गर्दी असते.
टॅरिफमुळे संबंध बिघडले
ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात भारतावर २५ टक्के टॅरिफ लादला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी टॅरिफमध्ये आणखी २५ टक्के वाढ केली. अशा प्रकारे भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध बिघडले आहेत. यानंतर सोशल मीडियावर लोक अमेरिकन वस्तूंवर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलू लागलेत.
अमेरिकन उत्पादनांऐवजी भारतीय बनावटीच्या उत्पादनांचा वापर करावा असं लोक म्हणू लागले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, याचा अमेरिकन कंपन्यांच्या विक्रीवर किती परिणाम झाला आहे हे सांगणे कठीण आहे, परंतु अमेरिकन उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची चर्चा जोर धरत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
लोकांचं म्हणणं काय?
वॉव स्किन सायन्सचे सह-संस्थापक मनीष चौधरी यांनी लिंक्डइनवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये त्यांनी आपण भारतातील शेतकरी आणि स्टार्टअप्सना पाठिंबा दिला पाहिजे असं म्हटलंय. त्यांनी म्हटलं की 'मेड इन इंडिया' उत्पादनं जगात ओळखली पाहिजेत. त्यांनी दक्षिण कोरियाचे उदाहरण दिलं, जिथे अन्न आणि सौंदर्य उत्पादनं खूप प्रसिद्ध आहेत. ते पुढे म्हणाले, 'आम्ही हजारो मैल दूरवरून येणाऱ्या उत्पादनांसाठी रांगेत उभे आहोत. आम्ही अभिमानाने अशा ब्रँडवर पैसे खर्च केले आहेत जे आमचे नाहीत. तर आपल्याच देशातील उत्पादक त्यांच्याच देशात लक्ष वेधण्यासाठी संघर्ष करत आहेत.'
ड्राइव्हयूचे सीईओ रह्म शास्त्री यांनीही लिंक्डइनवर आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की भारताने ट्विटर (आता एक्स), गुगल, यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मसाठी स्वतःचे पर्याय निर्माण करावेत. भारताचे चीनसारखे स्वतःचे ट्विटर/गुगल/यूट्यूब/व्हॉट्सअॅप/एफबी असले पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.
भारतीय ब्रँड संघर्ष करताहेत
काही भारतीय रिटेल ब्रँड स्टारबक्स सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडशी स्पर्धा करत आहेत, परंतु त्यांना अजूनही जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणे कठीण जात आहे. दुसरीकडे, भारतातील तंत्रज्ञान सेवा कंपन्या जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. टीसीएस आणि इन्फोसिस सारख्या कंपन्या जगभरातील ग्राहकांना सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रदान करत आहेत.