Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांचा देशाच्या आर्थिक भवितव्यावरील विश्वास उडाला; रघुराम राजन यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 10:49 IST

शेअरमधील वाढ वस्तुस्थितीदर्शक नाही. भारतीय शेअर बाजार वेगाने वाढत आहे. मात्र, अनेक भारतीय गंभीर संकटात असल्याची काेणालाच जाणीव नाही. सर्वांना एकत्र घेऊन जात नाही, असा विकास काहीच उपयाेगाचा नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या आर्थिक भवितव्यावरील भारतीयांचा विश्वास उडाल्याचे मत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. नालसार विधि विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात ते व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून ते बाेलत हाेते. 

राजन यांनी सांगितले की, भारतीय शेअर बाजार वेगाने वाढत आहे. मात्र, अनेक भारतीय गंभीर संकटात असल्याची काेणालाच जाणीव नाही. सर्वांना एकत्र घेऊन जात नाही, असा विकास काहीच उपयाेगाचा नाही. काेराेना महामारीमुळे भारतीयांच्या भावनांवर परिणाम केला असून, मध्यम वर्गातील अनेक लाेक दारिद्र्यरेषेखाली गेले आहेत. अलीकडच्या काही वर्षांमध्ये आपला आत्मविश्वास कमी झाला आहे. आर्थिक भवितव्यावरील विश्वास घटला आहे. त्यातच महामारीमुळे आणखी खच्चीकरण झाले आहे, असे राजन म्हणाले. आर्थिक सुधारणांचा भर चांगल्या नाेकऱ्या उपलब्ध करण्यावर असायला हवा. 

आर्थिक कामगिरीचा लाेकशाहीवरही परिणामआर्थिक कामगिरीत घट हाेत असतानाच आपल्या लाेकशाहीवरील विश्वासार्हता, वाद करण्याची इच्छा, मतभेदांचा सन्मान आणि सहन करण्याची शक्ती प्रभावित हाेत असल्याचेही राजन यांनी सांगितले. भारताने विविध आंतरराष्ट्रीय वाणिज्य करारांमध्ये सहभागी हाेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

लाेकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यावर रघुराम राजन यांनी विशेष भर दिला. काेणत्याही परिस्थितीत जनतेचे पायाभूत अधिकारांचे संरक्षण करायला हवे. वादविवाद किंवा टीकेला दाबण्यात येते, तेव्हा एक चुकीचे धाेरण लागू हाेते आणि त्यातून सुधारणांची शक्यता कमी असते, असे राजन म्हणाले.

टॅग्स :रघुराम राजन