Join us  

भारतीय अर्थव्यवस्थेला 'अच्छे दिन', फ्रान्सला पछाडत भारताचे एक पाऊल पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 5:11 PM

भारतीय नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार 2017 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 2.59 लाख कोटी डॉलर एवढी झाली आहे.

नवी दिल्ली - भारतीय नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार 2017 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 2.59 लाख कोटी डॉलर एवढी झाली आहे. त्यामुळे फ्रान्सला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. मात्र, या स्पर्धेत भारत अद्यापही अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटनच्या पिछाडीवरच आहे. सन 2018-19 वर्षासाठी भारताचा जीडीपी 7.3% राहिल, असा अंदाज आहे. 

भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन आले आहेत. विकासाच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्थेने फ्रान्सला सातव्या स्थानावर ढकलत एक पाऊल पुढे टाकले आहे. गतवर्षी भारताचा जीडीपी 2.597 ट्रिलियन डॉलर होता, तर फ्रान्सचा जीडीपी 2.582 ट्रिलियन डॉलर एवढा होता. मात्र, जुलै 2017 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढ झाली आहे. सध्या भारताची लोकसंख्या 1.34 अब्ज एवढी आहे.  त्यामुळे भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनण्याच्या मार्गावर आहे. तर सातव्या क्रमांकावर घसरण झालेल्या फ्रान्सची लोकसंख्या 6 कोटी 7 लाख एवढी आहे. दरम्यान, गतवर्षी उत्पादन आणि उपभोक्ता खर्चात झालेल्या तेजीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ झाली आहे.

दरम्यान, यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्था 7.4 टक्के या गतीने तर पुढील वर्षी 7.8 टक्क्यांनी वाढेल असे सांगितले होते. तर 2018मध्ये चीनची अर्थव्यवस्था 6.6 टक्के व 2019 या वर्षी 6.4 टक्क्यांनी वाढेल असे भाकित केले होते. 2017 साली भारताची अर्थव्यवस्था 6.7 टक्क्यांनी तर चीनची अर्थव्यवस्था 6.8 टक्के असी प्रगती करत होती. तत्पुर्वी भारत हा सर्वात वेगवान अर्थव्यवस्थेचा देश म्हणून ओळखला गेला होता. 2016 साली भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रगतीचा वेग 7.1 टक्के इतका होता. मात्र, जीएसटी व निश्चलनीकरणामुळे तो वेग मंदावल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :भारतनरेंद्र मोदी